१. नृत्यसेवेचा सराव करण्यापूर्वी आणि करतांना
१ अ. ‘मागील वर्षी रथोत्सवाच्या वेळी नृत्यसेवेत झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळेल का ?’, असे वाटणे आणि या वर्षी ब्रह्मोत्सवात नृत्यसेवेची संधी पुन्हा मिळणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने वर्ष २०२२ मधील रथोत्सवाच्या वेळी मला नृत्यसेवेची संधी मिळाली होती. या सेवेची संधी मिळाल्याविषयी मला कृतज्ञता वाटली; परंतु देवाला अपेक्षित अशी भावपूर्ण नृत्यसेवा करण्यात मी न्यून पडले होते. ‘मागे झालेल्या चुका सुधारून भावपूर्ण नृत्यसेवा करण्याची संधी गुरुदेवांच्या जन्मोत्सवात पुन्हा मिळेल का ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. गुरुदेवांच्या कृपेने मला वर्ष २०२३ मध्ये ब्रह्मोत्सवातही नृत्यसेवेची संधी मिळाली !
१ आ. नृत्यसेवेविषयी मनात नकारात्मक विचार येणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचून मन सकारात्मक होणे : नृत्याच्या सरावाला जाण्यापूर्वी माझ्या मनात ‘मला नृत्य येत नाही. या सेवेत चुका होतील. मला जमणार नाही’, असे नकारात्मक विचार येत होते. त्याच दिवशी मी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला ‘एका साधिकेने तिच्या मनात सेवेविषयी असलेल्या नकारात्मक विचारांवर कशी मात केली ?’, याविषयीचा लेख वाचला. त्यामुळे माझे मन सकारात्मक झाले आणि माझ्याकडून प्रतिदिन गुरुदेवांना शरणागतीने प्रार्थना होऊ लागली.
१ इ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील नृत्याचा अभ्यास करणार्या साधिकांनी नृत्यसेवेतील बारकावे शिकवणे : नृत्यात सहभागी झालेल्या आमच्यापैकी बर्याच जणी नृत्य शिकलेल्या नाहीत. आम्हाला ‘अच्युताष्टकम्’वर आधारित या गीतामध्ये भगवान श्रीविष्णूचे दशावतार नृत्याद्वारे दाखवायचे होते. प्रत्येक अवताराची नृत्यातील मुद्रा निरनिराळी होती. त्या वेळी आम्हाला प्रत्यक्ष भगवंताच्या मुखावरील हावभावही साकारायचे होते.
सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांनी आम्हा साधिकांना भावपूर्ण नृत्य करण्यास शिकवले. त्याचप्रमाणे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) आणि कु. म्रिणालिनी देवघरे यांनी आम्हाला अवतारांच्या मुद्रांचे महत्त्व, मुद्रांशी निगडित काही श्लोक अन् चेहर्यावरचे हावभाव बारकाईने शिकवले. त्यांनी आमच्याकडून प्रत्येक मुद्रेचा सराव अत्यंत संयमाने आणि प्रेमाने करून घेतला.
१ ई. आम्ही १० – १२ दिवस प्रतिदिन २ ते ४ घंटे नृत्याचा सराव करूनही आम्हाला उत्साह आणि आनंद जाणवत होता.
१ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नृत्यसेवेतील साधिकांना गोपीभाव ठेवायला सांगणे आणि त्यानंतर त्याप्रमाणे सहजतेने प्रयत्न होऊ लागणे : नृत्याच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आम्हा साधिकांना गोपीभाव ठेवायला सांगितला. त्यांनी आम्हाला ‘आमची प्रत्येक कृती आणि विचार गोपींप्रमाणे होत आहे ना ?’, हेही पहाण्यास सांगितले होते. त्यानंतर विशेष प्रयत्न न करता माझ्याकडून ‘प्रत्येक प्रसंगात मी श्रीकृष्णाला अपेक्षित असे करत आहे ना ?’, याचे निरीक्षण होऊ लागले आणि कृती अन् विचार चांगले करण्याचा प्रयत्न होऊ लागला. यावरून मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संकल्पाची प्रचीती आली.
१ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलतांना ‘गोपी वृंदावनात बसल्या असून त्या श्रीकृष्णाविषयी बोलत आहेत’, असे जाणवणे : सराव करतांना मध्ये विश्रांती घेत असतांना ‘गुरुदेवांनी नृत्यसेवा कशी शिकवली ? ते नृत्यसेवा कशी करून घेतात ? आणि त्यांची कृपा’, यांविषयी आमच्यात चर्चा होत असे. एकदा आम्ही सर्व साधिका गुरुदेवांविषयी बोलत होतो. तेव्हा ‘गोपी वृंदावनात बसल्या असून त्या श्रीकृष्णाविषयी बोलत आहेत’, असे मला जाणवले.
१ ए. नृत्याचा सराव पाहिल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावजागृती होणे आणि त्यानंतर आणखी चांगले नृत्य होण्यासाठी प्रयत्न करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी नृत्याचा सराव पाहिल्यावर त्यांची पुष्कळ भावजागृती झाली. प्रत्यक्षात नृत्यासाठी आम्ही काहीच कष्ट घेतले नव्हते, तरीही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची भावजागृती झाली. तेव्हा ‘नृत्य परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्यात आम्ही न्यून पडत असूनही प्रत्यक्ष देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची भावजागृती होत आहे, तर आपण आणखी भावपूर्ण अन् आनंदाने नृत्य करायला हवे’, याची आम्हाला जाणीव झाली. त्यानंतर आम्ही साधिका आणखी आनंदाने आणि भावपूर्ण नृत्य करण्यासाठी प्रयत्न करू लागलो.
१ एै. उत्तरदायी साधकांनी सांगितलेले नृत्यातील पालट सहजतेने स्वीकारता येणे : काही उत्तरदायी साधकांनी आमच्या नृत्याचा सराव पाहिल्यावर त्यांनी आम्हाला नृत्यात काही पालट करायला सांगितले. सर्व साधिकांनी ते पालट स्वीकारून नृत्यातील रचना पालटली आणि नवे पालट आत्मसात् केले. ही प्रक्रिया आमच्याकडून अगदी सहजतेने झाली.
१ ओ. नृत्याच्या पोशाखातील पालट स्वीकारता येणे आणि ‘सर्व वस्त्रालंकार नारायणाच्या साधिकांचे आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे नृत्य करतांना कर्तेपणा न जाणवणे : नृत्याच्या वेळी घालायचा पोशाख काही जणींनी सहसाधिकांकडून घेतला होता, तर काहींकडे तो होता; परंतु ३ – ४ वेळा या पोशाखात पालट झाला. उंची आणि रंगसंगती यांनुसार आम्हा सर्वांचे पोशाख पालटले; परंतु सर्वांनी ते लगेच स्वीकारले. उत्सवाच्या २ दिवस आधी आमचे पोशाख आणि दागिने अंतिम झाले. आमच्यापैकी कुणाचाही पोशाख स्वतःचा नव्हता. आम्ही आश्रमातील एका साधिकेकडून घागरा आणि दुसर्या साधिकेकडून ओढणी घेतली होती. आम्ही प्रत्येक दागिनाही अन्य साधिकांकडून घेतला होता. त्यात आमचे काही नसून सर्वकाही श्रीमन्नारायणाच्या साधिकांचेच होते. त्यामुळे नृत्य करतांना मला कर्तेपणा जाणवत नव्हता.
१ औ. नृत्यसेवेतील आम्ही १२ साधिका वेगवेगळ्या प्रकृतीच्या आहोत; परंतु या सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांनी आम्हा सर्वांना एकरूप करून त्यांच्या चरणी अर्पण करून घेतले.
१ अं. नृत्यसेवा करतांना मनमोकळेपणा अनुभवता येणे : नृत्याचा सराव करतांना मनात आलेले नकारात्मक विचार आणि व्यासपिठावर जाण्याविषयी वाटणारी भीती यांविषयी आम्ही एकमेकींशी मोकळेपणाने बोलत होतो. आम्ही सर्व साधिका एकमेकांना आधार देत होतो. एखाद्या साधिकेला एखादी मुद्रा जमत नसल्यास बाकी सर्व साधिका तिला प्रोत्साहन देत होत्या. त्यामुळे ती साधिकाही प्रतिमा न बाळगता सहजतेने ती मुद्रा पुन्हा पुन्हा सराव करून शिकत असे.
२. ब्रह्मोत्सवाच्या वेळी नृत्यसेवा करतांना आणि केल्यानंतर
२ अ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी गुरुदेवांना पाहून मन आनंदी होऊन माझा भाव जागृत होत होता.
२ आ. गीतावर माझे शरीर नृत्य करत होते; परंतु चित्त समोर असलेल्या तिन्ही गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) भरभरून अनुभवत होते. ‘त्यांचा एक दृष्टीक्षेप आपल्यावर पडावा’, यासाठी माझे मन आतुरले होते. ही स्थिती पूर्ण नृत्य होईपर्यंत होती.
२ इ. ‘७ मिनिटे १५ सेकंदांचे नृत्य १ – २ मिनिटांत संपले’, असे मला वाटले. नृत्यानंतरही ‘मी नृत्य केले’, असे मला वाटतच नव्हते. ‘काय केले ?’, हेही मला आठवत नव्हते. याविषयी मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘जेव्हा ‘मी काही केले नाही’, असे वाटते, तेव्हाच ती सेवा गुरुचरणी अर्पण झालेली असते.’’ तेव्हा ‘नृत्य शिकवणाराही श्रीकृष्ण, करून घेणाराही श्रीकृष्ण, करणाराही श्रीकृष्ण आणि शास्त्र सांगणाराही श्रीकृष्णच !’, असे वाटून माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२ ई. नृत्यसेवेसाठी आम्हा साधिकांचा पोशाख, केशरचना, हाता-पायांवर काढलेली मेंदी इत्यादी सर्व सारखे होते. जसे बाह्यतः हे सर्व सारखे होते, तसा सर्वांच्या मनात एकच श्रीमन्नारायण होता ! त्यामुळे ब्रह्मोत्सवात नृत्यसेवा सादर केल्यानंतर अनेक संत आणि साधक यांनी सांगितले, ‘‘सर्वांच्या नृत्यातील मुद्रा एकाच वेळी आणि सारख्याच होत होत्या.’’
गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाचे क्षण आठवले, तरी माझी भावजागृती होते. या सेवेच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला गोपीभाव शिकवला आणि आमच्याकडून तसे प्रयत्न करून घेतले. ‘आम्हाला या सेवेची संधी दिली आणि ही सेवा समर्पित करून घेतली’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(१५.५.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक