कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे अश्‍लील छायाचित्रे काढल्याचा आणखी २३ तरुणींचा आरोप !

  • तरुणींची अश्‍लील छायाचित्रे काढून ती प्रसारित केल्याचे प्रकरण

  • कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम जाणा !

पालघर – कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या (‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या आधारे) आधारे आमची अश्‍लील छायाचित्रे बनवली, असे आणखी २३ तरुणींनी पुढे येऊन सांगितले आहे. त्यांची अश्‍लील छायाचित्रे अश्‍लील संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहेत. या प्रकरणी केंद्रीस अन्वेषण विभागाच्या माध्यमातून (‘सी.बी.आय.’च्या) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

१. नालासोपारा पश्‍चिम येथील कळंब गावात रहाणारा जीत निजाई (वय १९ वर्षे) या तरुणाने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे मुलींची अश्‍लील छायाचित्रे सिद्ध करून ती ‘इन्स्टाग्राम’वरील बनावट खाते, तसेच अश्‍लील संकेतस्थळे यांवर प्रसारित केली होती. या प्रकरणी २ अल्पवयीन मुलींनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी जीत निजाई आणि त्याचा भाऊ यश निजाई याला अटक केली होती. जीत निजाईच्या भ्रमणभाषमध्ये ९ मुलींची अश्‍लील छायाचित्रे सापडली.

२. पीडित तरुणींनी आगरी सेनेच्या साहाय्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘या पीडित तरुणींना आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून भ्रमणभाष येत असल्याने ही घटना एका आंतरराष्ट्रीय ‘सेक्स रॅकेट’चा भाग आहे’, असा आरोप आगरी सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी केला आहे.

३. पोलिसांनी आरोपीचा भ्रमणभाषसंच न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये) पाठवला आहे. या प्रकरणी २२ ऑगस्ट या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे ‘प्रत्येक मुलीचा स्वतंत्र गुन्हा नोंदवता येत नाही. आम्ही संबंधित पीडित मुलींचे जबाब नोंदवत आहोत’, अशी माहिती पोलिसांनी दिली.