सध्या मधुमेह (डायबेटीस) होण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. एकदा हा आजार झाला की, ‘आयुष्यभर गोळ्या, औषधे आली’, या ताणानेच बरेच जण हतबल होतात. आपली जीवनशैली ही आजाराशी जुळवून घेणारी ठेवली, तर मधुमेह होऊनसुद्धा दीर्घायुषी होता येईल. मधुमेह होण्याला अनुवंशिकता हे कारण तर आहेच; पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे, म्हणजे चुकीची जीवनशैली हे एक कारण आहे. आजच्या लेखात आपण मधुमेही रुग्णांनी लक्षात ठेवावी, अशी काही सूत्रे बघणार आहोत.
१. स्वतःचा आजार स्वीकारून योग्य ती उपाययोजना करण्यावर भर द्यावा !
आपल्याला मधुमेह झाला आहे किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण धोक्याच्या पातळीला पोचले आहे, हे समजल्यावर बर्याच जणांना ताण येतो; परंतु उपाययोजना करण्याकडे त्यांचा कल अल्प असतो. तेव्हा ताण न घेता परिस्थिती स्वीकारून आपल्याला योग्य तो औषधोपचार आणि जीवनशैलीत पालट हे दीर्घकाळापर्यंत आरोग्यदायी ठेवणार आहेतच, याची निश्चिती बाळगावी.
२. मधुमेह झाल्यास वैद्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा !
मधुमेह झाल्यावर बरेच जण मनाने किंवा सामाजिक संकेतस्थळावर उपलब्ध होणार्या माहितीच्या आधारे मनाने औषध उपचार करतात; परंतु असे उपचार करतांना ते आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने योग्य आहेत का ? याची खात्री मात्र करत नाहीत. त्यामुळे अशा उपचारांचा त्यांना लाभ होण्याऐवजी अपायच होतांना दिसतो. उदाहरण द्यायचे झाले, तर एका रुग्णाने मधुमेह झाल्यावर मेथी दाण्याची पावडर प्रतिदिन २ चमचे घेण्यास प्रारंभ केला. त्याचा परिणाम म्हणून रुग्णाला पित्ताचा त्रास होण्यास प्रारंभ झाला. इथे रुग्णाने त्याची पित्त प्रकृती आहे, हे लक्षात न घेतल्याने मधुमेहावर त्याचा परिणाम अपेक्षित असा न होता इतर आरोग्याच्या तक्रारी चालू झाल्या.
३. कफ आणि मेद यांना बिघडवणारा आहारविहार टाळणे महत्त्वाचे !
अ. मधुमेहाचा संबंध प्राधान्याने कफ आणि मेद धातूशी आहे. त्यांना बिघडवणारा आहार म्हणजे गोड चवीचे; तेल, तूप यांसारख्या स्निग्ध पदार्थांनी युक्त असे पदार्थ, मैदा किंवा बेकरीतील इतर पचायला जड पदार्थ, शिळे किंवा अतीथंड पदार्थ, दही, साखर, गूळ, मेवा-मिठाईचे पदार्थ इत्यादी पूर्णतः टाळले पाहिजे.
आ. नेहमी आरामात बसून रहाणे, अतीप्रमाणात झोप घेणे, व्यायाम न करणे, बैठे काम, लठ्ठपणा अशी जीवनशैली मधुमेह होण्यास कारणीभूत ठरते. याचाच अर्थ काय, तर नियमित व्यायाम करणे, दिवसभर कृतीशील रहाणे मधुमेही रुग्णांसाठी आवश्यक आहे. ज्यांना मधुमेह नाही, अशांनी सुद्धा पुढे तो होऊ नये; म्हणून जागरूक राहून आपल्या जीवनशैलीत पालट करायला हवा.
इ. इतर कुठला व्यायाम शक्य नसेल, तर प्रतिदिन किमान ४० ते ४५ मिनिटे चालायला हवे.
४. पिष्टमय पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक !
बर्याच मधुमेही रुग्णांना दुसर्या दिवशी रक्ताची चाचणी करायची असली की, ते आदल्या दिवशी गोड खाण्याचे टाळतात, जेणेकरून उद्या आपली रक्तातील साखर प्रमाणात येईल; पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, फक्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानेच रक्तातील साखर वाढते, असे नसून आपण घेतलेल्या आहारात जे पिष्टमय पदार्थ आहेत त्यांच्यापासूनही शरिराला साखर मिळते. तेव्हा गोड बंद करायचेच आहे; पण पिष्टमय पदार्थांचे प्रमाणही आपल्याला नियंत्रित ठेवायचे आहे, हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
५. आता मधुमेही रुग्णाने काय खावे ?
अ. जेवणामध्ये गव्हाच्या पोळ्यांचा वापर न्यून करावा. पोळी करतांना ती तेल, तूप न वापरता करावी. जेवणामध्ये भाकरी असल्यास उत्तम; परंतु भाकरीसह लोणी, तूप घेऊन खाऊ नये.
आ. भात खायचा झाल्यास जुन्या तांदळाचा भात खावा. भात करतांना तांदूळ भाजून घ्यावे आणि पातेल्यात भात शिजवावा. त्यामुळे भात पचायला हलका होतो.
इ. भाज्या करतांना तेलाचा कमीत कमी वापर करावा. भाज्यांमध्ये पडवळ, शेवगा, वांगी, दोडकी, कोबी, पालक, शेपू, गवार, काकडी, टोमॅटो, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्या खायला हव्यात.
ई. मधुमेही रुग्णांच्या आहारामध्ये जिरे, आले, मेथी, हळद, लसूण, धने, कोथिंबीर यांचा वापर करता येऊ शकतो.
उ. दूध प्यायचे झाल्यास दोनदा साय काढलेले दूध प्यावे. लोणी काढलेले ताक पिऊ शकतो. ताकामध्ये जिरे, हिंग, हळद हे घातल्यास ते अधिक पाचक होऊ शकते.
ऊ. ओल्या हळदीचे तेलाविना केलेले लोणचे खाऊ शकतो.
ए. फळांमध्ये संत्री, मोसंबी, आवळा, कवठ, जांभूळ, पपई, डाळिंब, बोर, कलिंगड यांसारखी फळे चावून खावीत. संत्री-मोसंबीचा रस घ्यायचा झाल्यास साखर न घालता घ्यावा.
६. मधुमेही रुग्णांनी काय खाणे टाळावे किंवा कोणते पदार्थ न्यून खावेत ?
अ. पोहे, बटाटे, रताळे, सुरण, साबुदाणा यांचे प्रमाण अगदी न्यून ठेवावे. ८ ते १५ दिवसांतून एकदा खाण्यात आले, तरी ते अल्प प्रमाणात खावे.
आ. दुधापासून बनवलेले चीज आणि पनीर असे पचायला जड पदार्थ बंद करावेत.
इ. सीताफळ, द्राक्ष, आंबा, केळी ही फळे अल्प प्रमाणात खावी.
ई. गूळ, साखर, पक्वान्ने, मिठाई, मद्य, पनीर हे पदार्थ पूर्णपणे टाळा.
उ. सुकामेवा कमीत कमी खावा.
ऊ. गोड विरुद्ध कडू म्हणून कडू चवीच्या पदार्थांचा भडिमार शरिरावर करू नये. यामध्ये समतोल राखावा.
७. जेवणाच्या वेळा निश्चित करून त्या वेळेत थोडे थोडे खावे. पोटाला तडस (पोट गच्च भरेपर्यंत) लागेपर्यंत कधीच जेवू नये. जेवल्यानंतर लगेच झोपू नये. औषधे नियमित घ्यावीत, ती मध्येच बंद करू नयेत. रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित पडताळत रहावे.
८. रक्तातील साखर दीर्घकाळापर्यंत वाढलेली राहिली, तर त्याचा परिणाम डोळा, किडनी, मोठ्या रक्तवाहिन्या, हृदय, मज्जातंतू यांवर होऊ लागतो. मधुमेहाचे अवयवांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आहार, औषधे, व्यायाम हे नियमित आणि संयमित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मधुमेह स्वीकारून आनंदाने जगता येईल.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२८.८.२०२३)