नागपूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) – श्री सिद्धिविनायक मंदिर, नरेंद्रनगर आणि हिंदु जनजागृती समिती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्रनगरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मंदिर विश्वस्तांची चौथी बैठक पार पडली. त्यात ७४ सदस्य आणि विश्वस्त उपस्थित होते. बैठकीत सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. ‘अशा बैठका नियमित झाल्या पाहिजेत’, असे सर्वांचे म्हणणे होते.
या वेळी प्रत्येकाने आपल्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे, धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, मंदिरातील फलकावर धर्मशिक्षण लिखाण करणे, मंदिरात देवता आणि धर्मशिक्षण यांची माहिती देणारे फ्लेक्स लावणे, सामूहिक आरती, सामूहिक गुढीपूजन, वेगवेगळ्या मंदिरात मासातून एकदा बैठक घेणे, सरकारीकरण झालेली मंदिरे परत भक्तांकडे सुपुर्द करणे या मोहिमांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.
‘परिसरातील सर्व मंदिरांना भेटी देऊन जवळीकता निर्माण करणे’ या विषयावरही चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील सर्व मंदिर विश्वस्तांचे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन घेण्याचे ठरले. यात येथील सर्वच मंदिर विश्वस्तांना सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले.
श्री सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त श्री. योगेश मेडसिंघे यांच्या सहकार्याने आणि पुढाकाराने ही बैठक पार पडली. बैठकीला समितीचे श्री. अतुल आर्वेनला यांनी संबोधित केले. त्या वेळी सर्वश्री मेडसिंघे, पाटणे, जुर्वे, कुळकर्णी, घोष, बांधवकर, जोशी, राजकारणे, नारनवरे, यादव, नागपूरकर, दळवी, तसेच सौ. अगस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
मंदिर विश्वस्तांनी मांडलेले विचार !
१. ‘वक्फ बोर्ड’ बंद व्हायला हवे; कारण अनेक मंदिरांच्या जागा हडपण्यात आल्या आहेत.
२. मंदिर विश्वस्तांनी मनाने एकत्र यायला हवे.
३. विदर्भातील मंदिरांची माहिती एकत्र करून सगळ्यांनी संपर्कात रहायला हवे.
४. मोठ्या मंदिरांनी लहान मंदिरांना आर्थिक किंवा अन्य साहाय्य करायला हवे.
५. ईश्वराच्या चरणी धन अर्पण करणे हे सगळ्यात मोठे आणि सुरक्षित ‘सेव्हिंग’ आहे. ‘तेच आपले रक्षण करणार आहे’, हा भाव सगळ्यांच्या मनात निर्माण व्हायला हवा.
६. सगळ्या संप्रदायांनी संकुचित न रहाता हिंदु म्हणून एकत्र यायला हवे.
विशेष मनोगत !
१. ‘आजच्या बैठकीसारखी बैठक व्हावी’, असे अनेक वर्षांपासून मनात होते. – श्री. कुळकर्णी, हनुमानमंदिर, नरेंद्रनगर.
२. हिंदूंच्या मिरवणुका आणि मंदिरे यांवर आक्रमणे होतात. तिथे लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत. आपले रक्षण आपल्यालाच करावे लागणार. त्यासाठी हिंदूंनी संघटित रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी उभारणेही तितकेच आवश्यक आहे. – श्री. मुकुल बांधवकर