सातारा शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक होणार ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप

सातारा, २६ ऑगस्ट (वार्ता.) – ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही, याची उणीव भासत होती. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून राज्यशासनाच्या वतीने या स्मारकासाठी २ कोटी रुपये निधी संमत झाला आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि आपणा सर्वांचे स्फूर्तीस्थान छत्रपती संभाजी महाराज यांना संपूर्ण देश ओळखतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या पाऊलखुणा सातारा शहरात असूनही त्यांचे स्मारक सातारा शहरात नाही, याची उणीव भासत होती.

२. छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक सातारा शहरात व्हावे, यासाठी सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागातून स्मारक उभे करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा चालू होता. याला यश आले असून शासनाच्या वतीने पहिला टप्पा म्हणून या स्मारकासाठी २ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.

३. या स्मारक उभारणीसाठी ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान, सातारा’ या नावाने नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली आहे. लोकाग्रहास्तव या स्मारकाचे अध्यक्षपद आम्ही घेतले असून उपाध्यक्षपदी हरीश पाटणे आहेत.

४. याविषयी प्रतिष्ठानची बैठक बोलवण्यात येणार असून इतरही मान्यवर आणि शंभूभक्तांच्या सूचना मिळवण्यासाठी अन् इतर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी समावेश करण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.