रुग्‍णाईत स्‍थितीत दुचाकीवरून दूरचा प्रवास करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून सतत समवेत असल्‍याची ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना आलेली अनुभूती

‘नोव्‍हेंबर २०२० मध्‍ये मी १ मास पोटदुखीच्‍या त्रासामुळे झोपून होतो. त्‍या वेळी मला उभे रहाणे आणि चालणेही अशक्‍य होते. तेव्‍हा मला कुडाळ सेवाकेंद्रात असलेली ‘माझी आई फार रुग्‍णाईत आहे’, असे समजले. अशा स्‍थितीत फोंडा ते कुडाळ (सिंधुदुर्ग) असा दुचाकीवरून प्रवास करतांना मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

श्री. रामानंद परब

१. दळणवळण बंदीमुळे कुडाळ येथे जाण्‍यासाठी आगगाडी किंवा बस उपलब्‍ध नसणे आणि ‘प.पू. गुरुदेवच घेऊन जाणार आहेत’, असे वाटणे 

मी एका संतांना माझी आई रुग्‍णाईत असल्‍याचे कळवल्‍यावर त्‍यांनी मला लगेच कुडाळ येथे जायला सांगितले. कोरोना महामारीचा काळ असल्‍याने दळणवळण बंदी होती. त्‍यामुळे मला कुडाळ येथे जाण्‍यासाठी आगगाडी किंवा बस असे कोणतेच साधन उपलब्‍ध नव्‍हते. तेव्‍हा ‘मी रुग्‍णाईत असूनही संतांनी मला आईला भेटायला जायला सांगितले आहे, तर प.पू. गुरुदेवच (परात्‍पर गुरु डॉ. आठवले हेच) मला घेऊन जाणार आहेत’, असे मला वाटले.

२. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ नामजपादी उपाय करण्‍यासाठी नेहमीपेक्षा लवकर येणे आणि त्‍यांनी ‘प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून तुमच्‍या समवेत सतत असल्‍यामुळे तुम्‍ही एकटे प्रवास करू शकता’, असे सांगणे

त्‍या काळात सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ प्रतिदिन सायंकाळी माझ्‍यासाठी २ घंटे नामजपादी उपाय करत होते; मात्र त्‍या दिवशी ते दुपारी २.३० वाजताच माझ्‍यासाठी नामजपादी उपाय करण्‍यासाठी आले. याचे मला आश्‍चर्य वाटले. ‘प.पू. गुरुदेवांनीच त्‍यांना त्‍या दिवशी लवकर येण्‍याचा विचार दिला’, असे मला वाटले. मी सद़्‍गुरु गाडगीळकाकांना कुडाळ येथे आईला बघायला जाणार असल्‍याचे सांगितले. त्‍या वेळी ते मला म्‍हणाले, ‘‘प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून तुमच्‍या समवेत सतत असतात. तुम्‍ही एकटे प्रवास करू शकता. काहीच काळजी नाही.’’ त्‍यानंतर त्‍यांनी माझ्‍यासाठी नामजपादी उपाय केले.

३. दुचाकीवरून प्रवास करतांना आलेल्‍या अनुभूती

अ. मी फोंडा, गोवा येथून दुचाकीने कुडाळ येथे जायला निघालो. मी दुचाकीवरून प्रवास करत असतांना ‘माझी दुचाकी कुणीतरी चालवत आहे. माझ्‍या मागे प.पू. गुरुदेव बसले आहेत. ते माझ्‍या खांद्यांवरून हात फिरवत आहेत आणि गाडी अलगद चालली आहे’, असे मला जाणवत होते.

आ. मार्ग पुष्‍कळ खराब असूनही मला कोणत्‍याही प्रकारचा त्रास झाला नाही.

इ. मला खांदेदुखी आणि कंबरदुखी असल्‍यामुळे एरव्‍ही दुचाकी चालवतांना अधून-मधून ५ ते १० मिनिटे थांबावे लागते. मला कुडाळ येथे जायला, म्‍हणजे १४० कि.मी. अंतर पार करायला ३.३० घंटे ते ४ घंटे लागतात; पण या वेळी मी २ घंट्यांत कुठेच न थांबता कुडाळ सेवाकेंद्रामध्‍ये सुखरूप पोचलो.

ई. प्रवासात माझा नामजप अखंड होत होता.

उ. मी कुडाळ सेवाकेंद्रात पोचल्‍यावर ‘मी लांबचा प्रवास करून आलो आहे’, असे मला वाटलेच नाही.

‘देवाने मला या अनुभूती दिल्‍या’, त्‍याबद्दल प.पू. गुरुदेवांच्‍या कोमल चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. रामानंद परब (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक