पणजी – भारतीय वायू दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (एल्सीए) एल्एस्पी-७ तेजसने २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ (दृष्टीक्षेपाच्या पलीकडील अस्त्र) या हवेतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. सुमारे २० सहस्र फूट उंचीवर या विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश आले. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करणारे हे एक परिपूर्ण उदाहरण ठरेल.
सौजन्य विऑन
एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआर्डीओ), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच्एएल)चे चाचणी संचालक आणि शास्त्रज्ञ, यांच्यासह ‘सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन’ आणि हवाई गुणवत्ता हमी महासंचालक यांनी या चाचणी प्रक्षेपणाचे परीक्षण केले. या विमानाचे परीक्षण आणि देखरेख दुसर्या एका तेजस ‘ट्वीन सीटर’ विमानानेही केले.
अस्त्र हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ध्वनीपेक्षा अधिक वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, संशोधन केंद्र इमारत आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती अन् विकास केला आहे. स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्राचे स्वदेशी तेजस लढाऊ विमानावरून प्रक्षेपण, हे ‘आत्मनिर्भर भारत’ लक्ष्यपूर्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस-एल्सीए वरून क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल सर्व सहभागी संस्था आणि उद्योग यांची प्रशंसा केली आहे.