१. लहानपणापासून उष्णतेचा तीव्र त्रास होणे आणि औषधोपचार करूनही बरे न वाटणे
‘मला वयाच्या १२ व्या वर्षापासून तीव्र स्वरूपाचा उष्णतेचा त्रास होत होता. त्यामुळे मला प्रत्येक आठवड्यात ४ – ५ दिवस ‘तोंड येणे, ओठ लाल होणे, अंग गरम होणे, अल्प तिखट असलेले पदार्थ खाण्यासही त्रास होणे’, अशा स्वरूपाचे त्रास होत होते. परिणामी मला काही दिवस औषधांसह पथ्याचा आहार घ्यावा लागायचा. उन्हाळ्याच्या कालावधीत त्रासाचे प्रमाण पुष्कळ वाढायचे. वैद्यांची औषधे घेण्यासह अधिकाधिक थंड पदार्थ आणि पेय ग्रहण केल्यावरच मला बरे वाटायचे. काही वेळा मी घेत असलेले एका वैद्यांचे औषधोपचार मला लागू पडले नाहीत, तर त्रास असह्य झाल्यामुळे मला दुसर्या वैद्यांकडे जावे लागायचे. मला औषधांचा गुण येण्यासही अधिक वेळ लागायचा.
२. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेले नामजपाचे उपाय केल्यावर उष्णतेचा त्रास न्यून होणे
जानेवारी २०२३ मध्ये मला होणारा उष्णतेचा त्रास पुष्कळच वाढला होता. त्यासाठी मी २ वेगवेगळ्या वैद्यांची औषधेही घेतली होती. त्यामुळे मी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी माझ्या या त्रासासाठी ‘श्री राम जय राम जय जय राम । श्री राम जय राम जय जय राम । श्री गणेशाय नम: । ॐ नम: शिवाय । ॐ नम: शिवाय ।’, हा ३ देवतांचा एकत्रित करायचा नामजप शोधून दिला. हा नामजप मला प्रतिदिन १ घंटा करायचा होता. नामजप चालू केल्यावर पहिल्याच मासात माझा ‘उष्णतेचा त्रास थोडा अल्प झाला आहे’, असे मला जाणवलेे.
३. नामजप करत असल्यामुळे घेतलेल्या औषधांचा गुण लवकर येणे
फेब्रुवारी मासातील काही दिवस मला उष्णतेचा विशेष त्रास जाणवला नाही; मात्र नंतरचे काही दिवस पुन्हा उष्णतेचा त्रास उफाळून आला. मार्च मासात देवद येथे वैद्य श्री. संदेश आणि सौ. गायत्री चव्हाण आले होते. मी त्यांच्याकडून आयुर्वेदीय औषधे घेऊन ती चालू केली. एरव्ही आयुर्वेदीय औषधे घेतल्यानंतर मला औषधांचा गुण जाणवण्यास १० – १२ दिवस लागतात. सद़्गुरु गाडगीळकाकांनी दिलेला नामजप चालू असल्याने मला वैद्यांच्या औषधांचा गुण एका आठवड्यातच आला. मार्च मासात माझ्या शरिरातील उष्णतेचे प्रमाण निम्म्याहून अधिक अल्प झाले. एरव्ही एप्रिल आणि मे मासांत, म्हणजेच उष्णता अधिक असलेल्या मासात मला ‘तोंड येणे, शरिराचा दाह होणे, पित्ताचा प्रकोप होणे, परिणामी अन्नग्रहण करू शकत नसल्यामुळे वजन घटणे’, असे त्रास होतात; पण या वर्षी (वर्ष २०२३ मध्ये) मला हे त्रास झाले नाहीत.
४. जाणवलेले पालट
४ अ. उष्णतेचा त्रास न्यून झाल्यामुळे ‘भूक लागणे आणि वजन वाढणे’, असे चांगले शारीरिक पालट जाणवणे : उष्णतेच्या त्रासामुळे माझे वजन सारखे घटत असते. याविषयी वैद्य श्री. आणि सौ. चव्हाण यांनी मला सांगितले, ‘‘उष्णतेचा त्रास जसा अल्प होत जाईल, तसे तुमचे वजन आणि प्रकृती सुधारत जाईल.’’ त्याप्रमाणे माझा उष्णतेचा त्रास आता अल्प होत चालला आहे. त्यामुळे ‘भूक लागणे आणि वजन वाढणे’, असे चांगले शारीरिक पालट होत आहेत.
४ आ. या नामजपामुळे ‘उष्णतेच्या त्रासावर मात करू शकतो’, असा मनात आत्मविश्वास निर्माण होणे : ‘माझ्या मनातील उष्णतेची भीती निघून गेली आहे’, असे मला वाटते. ‘आता मी उष्णता आणि त्यासंबंधीच्या विकारांवर मात करू शकतो’, असा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला आहे. परिणामी माझ्या मनाची अस्वस्थता न्यून झाली आहे.
५. कृतज्ञता
या नामजपामुळे मला उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास न्यून झाला असून त्यामुळे माझी मोठी अडचणच दूर होत आहे. या अनुभूतीसाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. यज्ञेश सुरेश सावंत, देवद आश्रम, पनवेल. (३०.५.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |