स्‍वत:त पालट करून आनंदी असणार्‍या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) शुभांगी दामले ( वय ८४ वर्षे ) !

‘२८.७.२०२३ या दिवशी कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती शुभांगी दामले यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या निधनाच्‍या १२ व्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने कै. (श्रीमती) शुभांगी दामले यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली असल्‍याचे घोषित करण्‍यात आले. २४.८.२०२३ या दिवशी कै. (श्रीमती) शुभांगी दामले यांचे मासिक श्राद्ध आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची मुलगी सौ. मनीषा वाडीकर यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (श्रीमती) शुभांगी दामले

१. ‘माझ्‍या आईची (कै. (श्रीमती) शुभांगी दामले यांची) आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली’, हे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये वाचल्‍यावर मला पुष्‍कळ आनंद झाला. माझ्‍या डोळ्‍यांत आनंदाश्रू येऊन माझी भावजागृती झाली आणि माझ्‍या आईविषयीच्‍या काही स्‍मृती जाग्‍या झाल्‍या.

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी आईला ‘तुम्‍ही काही काळजी करू नका आणि तुमचीही प्रगती चांगली होत आहे’, असे सांगणे

दादांच्‍या (साधिकेच्‍या वडिलांच्‍या (कै. विनायक दामले, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के) निधनानंतर आईने प.पू. डॉक्‍टरांना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) दूरभाष केला होता. तेव्‍हा आई त्‍यांना म्‍हणाली, ‘‘जसे तुम्‍ही दादांच्‍या (यजमानांच्‍या) पाठीशी होतात, तसे माझ्‍या पाठीशीही रहा.’’ त्‍या वेळी प.पू. डॉक्‍टर तिला म्‍हणाले, ‘‘हे काय सांगायला हवं ? तुम्‍ही काही काळजी करू नका. तुमचीही प्रगती चांगली होत आहे.’’ त्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या कृपेने आईची प्रगती झाली. धन्‍य ते गुरु !

सौ. मनीषा वाडीकर

३. वर्तमानकाळात रहाणे 

आई माझ्‍या वडिलांमध्‍ये (दादांमध्‍ये) कधीच अडकली नव्‍हती. दादांचे निधन होऊन ३ वर्षे झाली; मात्र एकदाही ‘ती दादांची आठवण काढून दुःख करत आहे’, असे दिसले नाही. ती प्रत्‍येक परिस्‍थितीत आनंदी होती.

४. आईच्‍या वागण्‍यात जाणवलेला पालट 

अ. ती इतरांनी सांगितलेले लगेच ऐकत असे.

आ. एकदा ती माझ्‍याकडे आली असतांना आम्‍ही कोल्‍हापूर सेवाकेंद्रात गेलो होतो. त्‍या वेळी तिला झेपत नसतांनाही ती २ जिने चढून साधकांना भेटायला आली होती. तेव्‍हा तिच्‍या चेहर्‍यावर मला कृतज्ञताभाव जाणवत होता आणि तिचा चेहराही प्रसन्‍न वाटत होता.

इ. पूर्वी आईला ताण येत असे आणि तिच्‍या चेहर्‍यावर त्रासिक भाव असत. एकदा आम्‍हाला प.पू. डॉक्‍टरांचा सत्‍संग लाभला. प.पू. डॉक्‍टरांचा सत्‍संग लाभल्‍यावर आईची भावजागृती होऊन तिच्‍या डोळ्‍यांतून अखंड भावाश्रू येत होते. तेव्‍हापासून आईच्‍या चेहर्‍यावरचा ताण नाहीसा झाला आणि तिच्‍या चेहर्‍यावर देवाप्रती भाव जाणवू लागला होता.

५. आईने नामजप होत नसल्‍याविषयी सांगणे आणि मुलीने सांगितल्‍यानुसार आईने प्रतिदिन सनातनच्‍या ‘चैतन्‍यवाणी अ‍ॅप’वरील नामजप ऐकून नामजप करणे

१८.७.२०२३ या दिवशी म्‍हणजे आईचेे निधन होण्‍याच्‍या १० दिवस आधी मी तिला कुडाळ येथे भेटायला गेले होते. तेव्‍हा तिने मला सांगितले, ‘‘माझा अलीकडे नामजप होत नाही.’’ मी तिला सांगितले, ‘‘सनातनच्‍या ‘चैतन्‍यवाणी अ‍ॅप’वरील नामजप ऐकून नामजप कर, म्‍हणजे तुझे नामस्‍मरण होईल.’’ नंतर मी परत कोल्‍हापूर येथे आले. तेव्‍हापासून आई प्रतिदिन ‘चैतन्‍यवाणी अ‍ॅप’वरील नामजप ऐकून नामजप करत होती.

६. साधिका नामजप करतांना तिच्‍याकडून सूक्ष्मातून आईवरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढले जाणे आणि ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले साधिकेच्‍या माध्‍यमातून आईला चैतन्‍य देत होते’, हे लक्षात येणे

‘प.पू. गुरुदेवांनाच तिची प्रगती व्‍हावी’, अशी तळमळ होती. मी सकाळी ६ वाजता नामजप करतांना आईच्‍या निधनापूर्वी १५ दिवस ती मला प्रतिदिन सूक्ष्मातून दिसत असे. त्‍या वेळी माझ्‍याकडून आईवरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण आपोआप काढले जात असे. ‘त्‍या वेळी असे का होत आहे ?’, ते मला समजले नाही. ‘माझ्‍या माध्‍यमातून ‘प.पू. डॉक्‍टर तिला चैतन्‍य देत होते’, असे माझ्‍या लक्षात आले.

प.पू. गुरुदेवांनीच ही सूत्रे लिहून घेतल्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘प.पू. डॉक्‍टर, तुमच्‍या कृपेने जशी आई-दादांची(वडिलांची) प्रगती झाली, तशी माझीही प्रगती होऊ दे’, अशी तुमच्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. मनीषा नितीन वाडीकर (कै. (श्रीमती) शुभांगी दामले यांची मुलगी), कोल्‍हापूर (२१.८.२०२३)