भारत जगात सर्वाधिक गतीने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ! – पंतप्रधान मोदी

‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेला केले संबोधित !

(ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या प्रमुख देशांच्या गटाला ‘ब्रिक्स’ नावाने संबोधिले जाते.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – वैश्‍विक अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर असतांना ‘ब्रिक्स’ देशांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. अशातच भारत सर्वाधिक गतीने वृद्धींगत होणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, याविषयी कोणतीच शंका नाही. येणार्‍या काळामध्ये भारत जगाचे ‘प्रगतीचे यंत्र’ बनेल. याचे कारण असे की, आपत्ती आणि अडचणींच्या काळाला भारताने आर्थिक सुधारणेच्या रूपातील संधीमध्ये परिवर्तित केले, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथे आयोजित ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेला संबोधित करत होते.

१. यंदाची ब्रिक्स देशांची शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेत होत असून पंतप्रधान मोदी हे २२ ऑगस्ट या दिवशी जोहान्सबर्गसाठी रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले.

२. पंतप्रधान मोदी यांनी अन्य ब्रिक्स नेत्यांसोबत वैश्‍विक विकास आणि आव्हाने यांच्यावर उपाय योजण्यासाठी या व्यासपिठावरून विचारांचे आदान-प्रदान केले. या वेळी पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार का, यावर मात्र साशंकता आहे.

३. युक्रेनवर आक्रमण केल्याचा आरोपामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना जोहान्सबर्गमध्ये आमंत्रित करण्यात आलेले नाही. ते ऑनलाइनच्या माध्यमातून परिषदेत सहभागी होणार आहेत.