व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करून म्हादई वाचवा ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादई जलवाटप तंटा

‘वाघ’ वाचवा, ‘म्हादई’ वाचवा !

पणजी, २१ ऑगस्ट (वार्ता.) – म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास कर्नाटकला म्हादईवर कळसा-भंडुरा प्रकल्प उभारून म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. गोवा सरकारने लवकरात लवकर म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावे, अशी मागणी प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी केली आहे.

प्रा. राजेंद्र केरकर

कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवू नये, यासाठी गोवा सरकारने सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केलेली आहे. म्हादई अभयारण्यात वाघांचा अधिवास असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा आदेश गोवा सरकारला हल्लीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संसदीय व्यवहार, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतेच म्हादई अभयारण्यातील प्रस्तावित व्याघ्र संरक्षित क्षेत्रामुळे म्हादईचे पाणी कळसा-भंडुरा प्रकल्प उभारून वळवण्यास अडथळा निर्माण होणार असल्याचे विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी ही मागणी केली आहे.


सविस्तर वृत्त वाचा –

कर्नाटकातील शेतकर्‍यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाबाहेर म्हादईवरील प्रकल्पावरून निदर्शने !
https://sanatanprabhat.org/marathi/712982.html


प्रा. राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, ‘‘म्हादई अभयारण्यात मनुष्यविरहित भूमी व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करून पट्टेरी वाघांचे संरक्षण केल्यास कर्नाटकच्या कळसा, भंडुरा, हलथरा आणि सुर्ला या चालू असलेल्या प्रकल्पांना अडथळा निर्माण होणार आहे. म्हादई जलविवाद लवादाने कर्नाटकला पाणी वळवण्यासाठी पर्यावरण आणि वन्यजीव अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास कर्नाटकला या अनुज्ञप्ती मिळणे कठीण होणार आहे.’’

 ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा