गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीचा इतिहास समजण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ म्हणून आयोजित करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारताने काय गमावले ? याची चर्चा चालू झाली आहे. प्रतिवर्षी ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ आयोजित करून भारतियांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी कोणती किंमत चुकवावी लागली? हे सतत त्यांच्या समोर राहील, हाच उद्देश आहे. यातून ‘भविष्यात चुका होऊ नयेत, तसेच जी चूक झाली आहे, ती भविष्यात सुधारण्याची इच्छाशक्ती पुढच्या पिढीमध्ये निर्माण व्हावी’, असेच पंतप्रधान मोदी यांना वाटले असणार, यात शंका नाही. आता यावर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (‘सी.बी.एस्.ई.’ने) देशातील त्याच्याशी संलग्न शाळांमध्ये वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी झालेल्या रक्तपाताची माहिती देण्याचे परिपत्रक काढले आहे.
सध्याच्या पिढीला फाळणीचा आणि त्या वेळी झालेल्या दंगलींची माहिती मिळावी, या उद्देशाने सी.बी.एस्.ई.ने हे परिपत्रक काढले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. ‘भारताच्या फाळणीचा रक्तपाताचा इतिहास भयंकर आहे. नव्या पिढीपुढे हा इतिहास जाऊ नये, फाळणीचा इतिहास शिकवणे कुणाच्याही हिताचे नाही’, असे सांगत याला पवार यांनी विरोध केला आहे. पवारांचा स्वतःचा इतिहास पाहिला, तर त्यांच्याकडून असा विरोध होणार, हे अनपेक्षित म्हणता येणार नाही. मुंबईत १२ मार्च १९९३ या दिवशी ११ साखळी बाँबस्फोट झाले; मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ‘१२ बाँबस्फोट झाले’, असे खोटेच सांगितले. हे बाँबस्फोट दाऊदच्या टोळीने पाकिस्तानच्या आदेशावरून हिंदूबहुल भागात घडवून आणले होते. मुंबईतील दंगलीचा सूड घेण्यासाठी हे स्फोट घडवण्यात आले; मात्र पवार यांनी हिंदूबहुल भागांतच नाही, तर मुसलमानबहुल भागातही एक बाँबस्फोट झाल्याचे खोटे सांगून हिंदूंची आणि देशाची दिशाभूल केली होती. हा खोटेपणा त्यांनीच काही वर्षांनी पत्रकारांना सांगत ‘पुन्हा दंगली होऊ नयेत’; म्हणून असे केल्याचा दावा त्यांनी केला होता. यातून शरद पवार यांनी फाळणीच्या रक्तपाताचा म्हणजेच १० लाख हिंदूंच्या हत्येचा, सहस्रो हिंदु महिलांवरील बलात्काराचा इतिहास दडपण्यास सांगणे, हे अनपेक्षित म्हणता येत नाही, हे लक्षात येते. मुसलमानांच्या मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करण्यात शरद पवार यांचे आयुष्य गेले आहे. हिंदु आणि हिंदुत्व यांची अॅलर्जी असणार्या पवारांनी मालेगाव बाँबस्फोटाच्या वेळी आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांना ‘मशिदीमध्ये मुसलमान बाँबस्फोट कसे करतील ?’, असे सांगत अप्रत्यक्ष हिंदूंना लक्ष्य करण्यास सांगितले आणि नंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना या प्रकरणात गोवण्यात आले आणि पुढे ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द प्रचलित करण्यात आला. अशा पवारांकडून हिंदूंवरील अत्याचाराचा सत्य इतिहास देशासमोर येत असेल, तर त्यांना कधीतरी रुचणार आहे का ? ते त्याला विरोध करणारच, हेच त्यांच्या वरील विधानावरून समजते.
भारताची दुसरी फाळणी रोखा !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद प्रतिवर्षी भारतीय साजरा करत असतात; मात्र ‘स्वातंत्र्य मिळवतांना भारताचे तुकडे करण्यात आले होते’, हा इतिहास देशातील जनतेसमोर कसा येणार नाही ? याची व्यवस्था काँग्रेसने केली होती. भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला ‘स्वातंत्र्य मिळवतांना काय गमावले ?’, हेही सांगण्याचा प्रयत्न चालू केला, हे चांगले पाऊल आहे. भारताच्या फाळणीचा इतिहास सांगणारी अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत. अनेक इतिहासतज्ञ आणि हिंदुत्वनिष्ठ नेते ही माहिती हिंदूंना सांगण्याचा प्रयत्न विविध माध्यमांतून करत आले आहेत अन् करत आहेत; मात्र सरकारी स्तरावरून, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथून ही माहिती नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न आता चालू झाला आहे. फाळणीचा वस्तूनिष्ठ इतिहास या पिढीला समजला, तर तत्कालीन शासनकर्त्यांनी म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी किती मोठी घोडचूक केली, हे लक्षात येणार, यात शंका नाही. म. गांधी, नेहरू आणि महंमद अली जिना यांच्यामुळे भारताची अन् हिंदूंची किती मोठी हानी झाली, हे समजणार आहे. हेच शरद पवार यांना नको आहे. ‘भारतातील हिंदूंनी सदैव आत्मघाती हिंदु-मुसलमान ऐक्यामध्ये गुंग राहून शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना मतदान करत रहावे’, अशीच त्यांची इच्छा आहे. हेच केंद्रातील भाजप सरकार पालटण्याचा प्रयत्न करत आहे. ‘फाळणीच्या वेळी भारतातील सर्व मुसलमानांनी पाकिस्तानात जावे आणि पाकमधील सर्व हिंदूंनी भारतात यावे’, असेच ठरवण्यात आले होते; मात्र नंतर गांधी आणि नेहरू यांनी मुसलमानांना ‘भारतात राहू शकता’, असे सांगितले आणि त्यामुळे गेली ७५ वर्षे हिंदूंची आणि पर्यायाने देशाची किती मोठी हानी होत आहे, हे नव्या पिढीच्या लक्षात येणार आहे. ७५ वर्षांपूर्वीचा रक्तपात आणि आताची भारतातील मुसलमान आणि पाकमधील हिंदु यांची स्थिती यांचाही अभ्यास या पिढीला करता येईल. फाळणीनंतर पाकमध्ये २२ टक्के असणारे हिंदू आज ३ टक्क्यांवर आले आहेत, तर त्या वेळी ९ टक्के असणारे भारतातील मुसलमान आता १४ टक्क्यांवर पोचले आहेत. फाळणीचा इतिहास समजल्यावर वर्तमानात भारतात अनेक ठिकाणी फाळणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे, हे तरुणांच्या लक्षात येईल. ३ दशकांपूर्वी काश्मीरमध्ये फाळणीसारखी स्थिती होऊन तेथून साडेचार लाख हिंदूंना पलायन करावे लागले, जे आजही तेथे परत जाऊ शकत नाहीत. अशी स्थिती भारतातील अनेक ठिकाणी भविष्यात निर्माण होणार आहे. ही स्थिती येऊ नये; म्हणून काय केले पाहिजे, हिंदूंचे आणि पर्यायाने देशाचे रक्षण कसे करावे लागले ? हे तरुणांच्या लक्षात येईल अन् ते आताच जागृत होऊन त्यासाठी प्रयत्न करतील. त्यातून हानी न्यून करता येईल. हेच शरद पवार यांच्यासारख्यांना नको आहे, त्यामुळेच ते याला विरोध करत आहेत.