छत्रपती संभाजीनगर येथील २०० कोटींचे आदर्श सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरण !
संभाजीनगर – काही दिवसांपूर्वी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील अपव्यवहार समोर आला असून २०० कोटी रुपयांहून हा अधिकचा आकडा आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आदर्श घोटाळा समोर आल्यावर ठेवीदारांची चिंता वाढली आहे. येथील आदर्श बँकेत ठेवलेली २७ लाख रुपयांची ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावात आणखी एका ठेवीदाराचा मृत्यू झाला. भानुदास उकर्डे असे त्यांचे नाव आहे.
भानुदास उकर्डे यांनी आदर्श बँकेत २७ लाख ५० सहस्र रुपयांची ठेव ठेवली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांची जवळपास १ कोटी रुपयांची ठेव बँकेत आहे. जिल्ह्यातील करमाड येथील आदर्श पतसंस्थेत शेतकर्यांनी डी.एम्.आय.सी. आणि समृद्धीमध्ये गेलेल्या शेतीचा पैसा मोठ्या व्याजाच्या आमिषाने ठेवी म्हणून ठेवलेले कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. ठेवीची मुदत संपल्यानंतर पतसंस्थेचा घोटाळा समोर आला.
आता भानुदास उकर्डे यांच्या निधनामुळे आदर्श घोटाळ्यातील हा दुसरा बळी ठरला आहे. यापूर्वी याच पतसंस्थेत २२ लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर इथर (वय ३८ वर्षे) या शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रामेश्वर यांनी मुलीचे शिक्षण आणि विवाह यांसाठी ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांचे वडील नारायण इथर यांच्या नावे या पतसंस्थेत ८ लाख ५० सहस्र रुपये, आई कासाबाई यांच्या नावे ९ लाख रुपये आणि मुलगी अश्विनी हिच्या नावे ५ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या.
संपादकीय भूमिका :भ्रष्टाचाराचा गंभीर परिणाम ! जनतेचे स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठीही भ्रष्टाचार निर्मूलन त्वरित होणे आवश्यक ! |