सर्वधर्मसमभावाच्‍या नावाखाली केवळ हिंदूंना जाब विचारणारे (निधर्मी) हिंदूच हिंदूंचे खरे वैरी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून आलेला अनुभव !

१ ते १५ ऑगस्‍ट या कालावधीत एका जिल्‍ह्यात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून अनुभवायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.  जिल्‍ह्यातील एका महाविद्यालयातील प्राचार्यांची अनुमती घेऊन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘क्रांतीगाथा प्रदर्शन’ लावण्‍यात आले होते. या सेवेमध्‍ये समितीचे कार्यकर्ते आणि काही धर्मप्रेमी सहभागी झाले होते. विद्यार्थ्‍यांचे प्रदर्शन पाहून झाल्‍यानंतर कार्यकर्ते त्‍यांना म्‍हणाले, ‘‘सर्व क्रांतीकारकांची माहिती आपण ऐकली. या क्रांतीकारकांनी बलीदान दिले, ते केवळ इंग्रजांनी केलेल्‍या अत्‍याचारांना आळा घालण्‍यासाठी. क्रांतीकारकांनी ही चळवळ केली नसती, तर आजही आपण इंग्रजांच्‍या गुलामगिरीत राहिलो असतो. म्‍हणूनच ज्‍यांनी आपल्‍यावर अत्‍याचार केले, त्‍यांचे संस्‍कारही आपल्‍या मनावरून बाजूला करूया, ‘हॅलो’ऐवजी ‘नमस्‍कार’ किंवा ‘जय श्रीराम’ म्‍हणू शकतो.’’ त्‍या वेळी सर्वांनी ‘हो आम्‍ही ‘जय श्रीराम’ म्‍हणणार !’, असे म्‍हटले.

कार्यकर्ते माहिती सांगत असतांना एक शिक्षिका प्रदर्शनाच्‍या प्रवेशद्वारातून आत न येता कनातीच्‍या मागून सर्व ऐकत होत्‍या आणि फेर्‍या मारत वारंवार आत वाकून बघत होत्‍या. ‘हॅलो’ ऐवजी ‘नमस्‍कार’ किंवा ‘जय श्रीराम’ म्‍हणू शकतो’, असे त्‍यांनी ऐकल्‍यावर त्‍या शिक्षिका प्रवेशद्वाराकडून न येता मधूनच कनात वर करून प्रदर्शन स्‍थळी आल्‍या. (सर्वसाधारण नियम पाळू न शकणार्‍या अशा शिक्षिका विद्यार्थ्‍यांना कसले धडे देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक) त्‍यानंतर त्‍यांनी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांशी वाद घातला.

शिक्षिका : हे तुम्‍ही काय सांगत आहात ? हे असे तुम्‍हाला कुणी करायला सांगितले? मुलांनी ‘हॅलो’ म्‍हटले, तर काय झाले ? आमची मुले परदेशात शिकायला गेली, तर तिथेही त्‍यांनी ‘हॅलो’ म्‍हणायचे नाही का ? (मातृभाषेत बोलल्‍यामुळे कुणाची हानी झाली आहे, असे एक तरी उदाहरण आहे का ? – संपादक)

कार्यकर्ता : तो प्रत्‍येकाचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. मुलांनी जर हे ऐकून चांगले वाटत असेल, तर तुम्‍हाला काय अडचण आहे ?

शिक्षिका : तुम्‍ही हिंदु जनजागृती समितीचे इथे क्रांतीकारक प्रदर्शन लावत आहात. इथे सर्व जाती-धर्माची मुले आहेत. तुम्‍ही प्रदर्शनात लावले, तेवढेच क्रांतीकारक होते का ? मुसलमान क्रांतीकारक होतेच ना ? तुम्‍ही जाणीवपूर्वक धर्माचा प्रसार करत आहात.

कार्यकर्ता : आम्‍ही हे प्रदर्शन प्रातिनिधिक स्‍वरूपात लावले आहे. अन्‍य क्रांतीकारक तुम्‍हाला ठाऊक असल्‍यास तुम्‍ही प्राचार्यांना विचारून त्‍यांचे प्रदर्शन लावू शकता. आम्‍ही ज्‍यांचा इतिहास वाचला, ज्‍यांचा आदर्श घ्‍यावा, असे वाटले, त्‍यांचे आम्‍ही प्रदर्शन लावले.

शिक्षिका : हा भारत देश सर्वधर्मसमभाव मानतो.

कार्यकर्ता : आम्‍ही मात्र धर्माधिष्‍ठित आहोत.

(या वेळी त्‍यांनी मोठ्याने बोलत वाद घातला. त्‍यामुळे धर्मप्रेमींनी अन्‍य ४ धर्मप्रेमींना भ्रमणभाष करून प्रदर्शनस्‍थळी बोलावले, तसेच एका शिक्षकाने घडलेला प्रकार उत्तरदायी प्राध्‍यापकांना सांगितला. सेवेला आलेले धर्मप्रेमी तेथे येऊन उभे राहिले.)

धर्मप्रेमी आणि शिक्षिका यांच्‍यामध्‍ये झालेले संभाषण

शिक्षिका : ‘जय श्रीराम’ म्‍हणून माझे पोट भरणार आहे का ? तुमचे तरी पोट भरते का ?

धर्मप्रेमी : हो, आमचे पोट भरते.

शिक्षिका : कसे भरते ? सांगा मला पण…

धर्मप्रेमी : मी प्रतिदिन सकाळी श्रीरामांना हात जोडून नमस्‍कार करतो, ‘जय श्रीराम’ म्‍हणतो आणि त्‍याच हातांनी मी काम करतो; म्‍हणून माझे पोट भरते. (हे ऐकून शिक्षिका निरुत्तर झाल्‍या.)

धर्मप्रेमी : तुम्‍ही प्रदर्शन चालू आहे तिथे वाद घालू नका. तुमचे प्रश्‍न आम्‍हाला सांगा आम्‍ही तुमची अडचण सोडवतो, थोडे बाजूला जाऊन बोलू.

बाजूला गेल्‍यावर झालेले संभाषण

धर्मप्रेमी : तुम्‍ही नुसते ‘जय श्रीराम’ म्‍हटल्‍यावर एवढा आरोप करता. महाविद्यालयात ज्‍या बुरखा घालून येतात, त्‍यांना तुम्‍ही कधी सांगितले का की, तुम्‍ही सर्वांसारख्‍या पोशाख करून या ?

शिक्षिका : हो सांगितले; पण माझे कुणी ऐकत नाही. (यातून अन्‍य धर्मियांचा धर्माभिमान दिसून येतो. हिंदूंना मात्र धर्मशिक्षण न मिळाल्‍याने त्‍यांना सर्वधर्मसमभावाच्‍या नावावर सर्वांचे ऐकून घ्‍यावे लागते ! – संपादक)

धर्मप्रेमी : मग त्‍यांच्‍या विरोधात कारवाई करा, अर्ज द्या. सर्वधर्मसमभाव हवा आहे ना ? सर्वांना समानच वागणूक द्या.

शिक्षिका : त्‍यांना आपण समजून घ्‍यायला हवे. त्‍यांच्‍या मध्‍ये स्‍त्रियांना आपल्‍यासारखे स्‍वातंत्र्य दिले जात नाही. त्‍यामुळे आपण त्‍यांना काही बोलू शकत नाही.

धर्मप्रेमी : मग तुम्‍ही कशाला विरोध करता ? हाच आहे का तुमचा सर्वधर्मसमभाव ?

यानंतर प्राध्‍यापक त्‍या ठिकाणी आले. त्‍यांनी शिक्षिकेला खडसावून सांगितले, ‘It’s not your duty. (हे तुमचे कर्तव्‍य नाही.) प्राचार्यांनी प्रदर्शनाची अनुमती दिली आहे. त्‍यामुळे आयोजक आणि प्राचार्य बघून घेतील, त्‍यामधे तुम्‍ही बडबड करू नका. तुम्‍ही कर्मचारी आहात, तर कर्मचारीच रहा….जेवढे काम दिले आहे तेवढेच करायचे.’ यानंतर सर्वांसमोरच त्‍या शिक्षिकेला प्रदर्शनस्‍थळावरून बाहेर काढण्‍यात आले. थोड्या वेळाने आम्‍हाला माहिती मिळाली की, त्‍या शिक्षिका एका धर्मद्रोही संघटनेशी संबंधित आहेत.

या प्रसंगावरून लक्षात आले की, निधर्मी हिंदूच हिंदूंचे वैरी आहेत; कारण हे निधर्मी लोक आपल्‍या शौर्यशाली इतिहासाचा अभ्‍यास न करता, सत्‍यता न पडताळता केवळ स्‍वतःला प्रसिद्धी मिळावी, या स्‍वार्थामुळे सर्वधर्मसमभाव या गोंडस नावाखाली हिंदूंचा मात्र बुद्धीभेद करतात. केवळ हिंदूंना विरोध करतात आणि अन्‍य धर्मीय असतील, तर त्‍यांना समजून घेण्‍याच्‍या नावाखाली मूग गिळून गप्‍प बसतात. असे व्‍यावहारिकदृष्‍ट्या सुशिक्षित असून धर्मशिक्षण नसलेले शिक्षक हेच आजच्‍या युवा पिढीला आपल्‍या धर्मापासून लांब नेण्‍याचे पापच करत आहेत.

मात्र ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे’, याची अनुभूती आम्‍हाला आली. शिक्षिका वाद घालत असतांना उपस्‍थित धर्मप्रेमींनी योग्‍य ते प्रबोधन केले. त्‍याचप्रमाणे प्राध्‍यापकांनीही त्‍या शिक्षिकेला सर्वांसमोर खडसावले आणि निघून जायला सांगितले. त्‍यामुळे सर्व मुलांनाही त्‍यातून योग्‍य तो बोध झाला. या प्रसंगातून परात्‍पर गुरुदेवांची कृपा अनुभवता आली.

श्री गुरुचरणी कृतज्ञता !

– हिंदु जनजागृती समितीची एक कार्यकर्ती