‘भारताचे माजी सैन्यप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाईदल प्रमुख तैवानच्या ३ दिवसांच्या भेटीवर गेले होते. तेथे त्यांनी ‘इंडो-पॅसिफिक सुरक्षा परिषदे’त भाग घेतला. हे तिन्ही माजी सैन्यदल प्रमुख एकाच वेळी तैवानला गेले होते. यापूर्वी असे कधीही झालेले नव्हते. यांतील जनरल मनोज नरवणे, अॅडमिरल करमवीर सिंह, एअर मार्शल भदोरिया हे निवृत झाले असले, तरी त्यांच्या भेटीचे महत्त्व अल्प होत नाही; कारण त्यांची ‘रँक’ (दर्जा) आधीप्रमाणेच होती. ते भारताच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
१. ‘जशास तसे’ हीच भाषा समजणारा चीन !
तैवान हा चीनचा एक क्रमांकाचा शत्रू आहे. चीनने अनेक वेळा म्हटले आहे, ‘आम्ही तैवानवर आक्रमण करून तो कह्यात घेऊ; कारण तो आमचा भाग आहे.’ भारताने ‘वन चायना पॉलिसी’ (अखंड चीनचे धोरण) स्वीकारली आहे. याचा अर्थ असा की, चीन तैवानला स्वतःचाच प्रांत समजतो. त्याप्रमाणे भारत तैवानला चीनचाच एक भाग समजतो. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये शपथ घेतली, तेव्हा तैवानचे उपमहामंत्री शपथ समारंभाला उपस्थित होते; परंतु ते वर्ष २०१९ च्या शपथ समारंभाला आले नव्हते. त्या काळात गलवानची घटना घडलेली होती. ‘त्या काळात भारताचे चीनशी संबंध सुधारतील’, असे वाटत होते.
परराष्ट्र मंत्रालयाला वाटते की, चीनशी गोड गोड बोलून त्यांच्याशी असलेले आपले संबंध सुधारता येतील. त्याविषयी मी याआधीही बोललेलो आहे की, चीनला ‘गोडबोल्या’ची भाषा कळत नाही. त्याला केवळ ‘जशास तसे’ उत्तरच समजते. चीन आणि पाकिस्तान हे असे देश आहेत, जेथे विदेशी धोरण किंवा मुत्सद्देगिरी यांचा कुठलाही लाभ होत नाही. त्यांना केवळ ‘जशास तसे’ उत्तर द्यायला हवे.
२. भारताचे चीनच्या विरोधात आक्रमक धोरण
गलवान प्रकरणानंतर भारताचे चीनशी असलेले संबंध बिघडले. त्यानंतर भारताने चीनच्या विरोधात अनेक आक्रमक कारवाया करण्यास प्रारंभ केला. फिलीपिन्स हा दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनचा एक मोठा शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मध्यंतरी ‘ज्या सामुद्री भागामध्ये चीन आणि फिलीपिन्स यांच्यात वाद आहे, तो सर्व समुद्र फिलीपिन्सचा आहे’, असा निर्णय दिला होता. या निर्णयाचे भारतानेही समर्थन केले होते.
काही मासांपूर्वी भारताने स्वतःकडील ‘ब्राह्मोस’ नावाचे क्षेपणास्त्र फिलीपिन्सला भेट दिले. काही दिवसांपूर्वी अशी बातमी होती की, फिलीपिन्सने त्यांचे एक निकामी जहाज खडकाळ भागात किंवा कृत्रिम बेटाच्या ठिकाणी अडकवून ठेवले आहे. चीन ते जहाज तेथून काढायला सांगत आहे; पण फिलीपिन्स ते हटवायला सिद्ध नाही. या भांडणातही भारताने फिलीपिन्सची पाठराखण केली होती. यासह भारताने व्हिएतनामला नौदलाचे ‘आय.एन्.एस्. किरपान’ हे जहाज भेट दिले. व्हिएतनाम हाही दक्षिण चीन समुद्रातील चीनचा शत्रू समजला जातो. भारत चीनच्या विरोधात हळूहळू अनेक कारवाया करत असतो.
तैवानला नुकत्याच झालेल्या परिषदेत जनरल मनोज नरवणे यांनी मत मांडले. यासमवेतच अॅडमिरल करमवीर सिंह बोलले की, सध्याच्या परिस्थितीत तैवानची खाडी महत्त्वाची आहे. दक्षिण चीन समुद्र महत्त्वाचा आहे आणि इंडो-पॅसिफिक समुद्रामध्ये शांतता राहिली पाहिजे. तेथे चीनची चालणारी दादागिरी योग्य नाही. ‘इंडो-पॅसिफिक सुरक्षा परिषद’ ही प्रत्येक वर्षी होते; पण यापूर्वी भारताने त्यात कधीही भाग घेतला नव्हता. आता भारत त्यात सहभागी होत आहे, याचा अर्थ भारत त्याची भूमिका अधिक तीव्र करत आहे.
३. भारत आणि तैवान मैत्रीमुळे होणारे लाभ !
अ. चीनचे वाणिज्यमंत्री भारतात आले होते. आतापर्यंत तैवानशी केवळ १२ देशांनीच राजकीय संबंध ठेवलेले आहेत. भारताचे तैवानशी राजकीय संबंध नाहीत; कारण भारत ‘वन चायना’ धोरण कार्यवाहीत आणतो. तरीही भारताला तैवानची आवश्यकता आहे. याची अनेक कारणे आहेत. अनेकदा विचारले जाते की, जेव्हा चीन आणि पाकिस्तान भारताच्या विरोधात दोन आघाड्यांवर युद्ध लढतील, तेव्हा भारत कसा लढेल ? याविषयी असेही म्हणता येईल की, दोन आघाड्यांवरील युद्ध लढण्यास आपण चीनला भाग पाडू शकतो. जेव्हा चीन तैवानवर आक्रमण करील, तेव्हा भारत-चीन सीमेवर लहान लहान आक्रमणे करून चिनी सैन्याला थोपवू शकतो. जेव्हा चीन भारताला पाकिस्तानच्या विरोधात लढायला भाग पाडेल, त्याच वेळी जर तैवानशी लढाई झाली, तर भारत चीनला ‘जशास तसे’ उत्तर देऊ शकतो.
आ. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, तसेच ‘सेमीकंडक्टर’ची निर्मिती करण्यात महाशक्ती आहे. हे तंत्रज्ञान भारताला अनेक क्षेत्रांमध्ये हवे आहे. असे म्हटले जाते की, तैवानची आतापर्यंत थेट विदेशी गुंतवणूक ही चीनच्या समवेत होती; पण चीन हा तैवानचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे तैवान ती गुंतवणूक हळूहळू काढून अन्य ठिकाणी पाठवत आहे. त्यातील बहुतांश गुंतवणूक ही भारतात येण्याची शक्यता आहे. हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. तैवानचे ‘फॉक्सकॉन’ आस्थापन गुजरातमध्ये ‘सेमीकंडक्टर’ बनवण्याचा कारखाना चालू करणार आहे. त्यामुळे भारताची तंत्रज्ञानाची शक्ती वाढू शकेल. अनेक तंत्रज्ञानांमध्ये तैवान भारताला साहाय्यभूत होऊ शकतो.
इ. तैवानचे लोक हे ‘हन चायनीज’ असल्याने त्यांना चीनविषयी पुष्कळ माहिती आहे. चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू असल्याने तैवान भारताला चीनची गुप्तचर माहिती देऊ शकतो. तैवान हा चीनवर सातत्याने संशोधन करत असतो. त्यांच्याकडील माहितीचा लाभ घेऊन भारत डावपेच आखू शकतो. त्यामुळे चीनची गुप्तहेर माहिती मिळवण्यासाठी तैवानचा भारताला मोठा लाभ होणार आहे. थोडक्यात ‘इंडो-पॅसिफिक’ समुद्रामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू इच्छितो.
ई. भारत चीनला ‘जशास तसे’ उत्तर देत आहे. या धोरणामुळे चीनची विशेष हानी होणार नाही; पण भारताने तैवानशी आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात संबंध वाढवायला पाहिजेत. त्यामुळे भारताचे आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील बळ वाढेल, जे चीनसाठी धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे तिन्ही माजी सैन्यप्रमुख, नौदल प्रमुख आणि हवाईदल प्रमुख तैवानला गेले होते. ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे. हे संबंध येणार्या काळात अधिक वाढतील, अशी अपेक्षा !’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे
संपादकीय भूमिकाभारत चीनचे ‘एकसंध चीन’ हे धोरण मान्य करतो, तर चीन भारताचा भूभाग गिळंकृत करतो, हा विरोधाभास ! |