साधिका रुग्‍णाईत असतांना सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी तिच्‍याकडून करून घेतलेली इंद्रियांची मानसशुद्धी !

‘२२.२.२०२० या दिवसापासून मला पुष्‍कळ ताप येत होता; म्‍हणून मी खोलीत झोपले होते. मला पुष्‍कळ ग्‍लानी आणि थकवा होता. त्‍यानंतर २३.२.२०२० या दिवशी दुपारी मी अर्धवट झोपेत होते. तेव्‍हा प्रत्‍यक्षात माझे डोळे उघडत नव्‍हते आणि मला झोपही लागत नव्‍हती. मी अशा स्‍थितीत असतांना माझ्‍याकडून आपोआपच इंद्रियांची मानसशुद्धी होऊ लागली.

कु. सविता जाधव

त्‍या वेळी मला अकस्‍मात् पुढील दृश्‍य दिसले, ‘एक मोठे मैदान आहे. तेथे परात्‍पर गुरु डॉ. आठवले आले आहेत. तेव्‍हा माझ्‍या देहातील आत्‍मा शरिरातील सर्व इंद्रियांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे येण्‍यासाठी सांगत आहे. माझ्‍या शरिरातील पांढर्‍या आणि लाल पेशी, डोळे, कान, जीभ अन् हात-पाय, तसेच हाडे, मांस, रक्‍त, सर्व रक्‍तवाहिन्‍या, तसेच माझे स्‍वभावदोष आणि गुण आदी सर्व जण एकेक करून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या समोर येऊन बसले आहेत. त्‍या वेळी माझ्‍या देहातील आत्‍मा परात्‍पर गुरुदेवांना म्‍हणाला, ‘आम्‍ही सर्व जण तुमच्‍याकडे आलो आहोत. आम्‍हाला शुद्ध व्‍हायचे आहे. आम्‍हाला तुम्‍हाला अपेक्षित असे घडायचे आहे.’ तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर हसले आणि म्‍हणाले, ‘तुम्‍ही सर्व जण आलात; पण जे तुमच्‍यामध्‍ये मुख्‍य अडथळा आणतात, ते आलेले नाहीत.’ तेव्‍हा आत्‍म्‍याला प्रश्‍न पडला, ‘कोण ?’ त्‍या वेळी ‘बुद्धी, अंतर्मन, बाह्यमन अन् अहं आलेलेच नाहीत’, हे त्‍याच्‍या लक्षात आले. तेव्‍हा आत्‍म्‍याने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची क्षमा मागितली आणि तो त्‍या सर्वांना घेऊन जाण्‍यासाठी निघाला. त्‍या वेळी आत्‍मा प्रथम अहंकडे गेला आणि त्‍याला म्‍हणाला, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर आले आहेत. त्‍यांचे दर्शन घेण्‍यासाठी तू चल. आपल्‍याला आता शुद्ध व्‍हायचे आहे.’ त्‍या वेळी अहं काही केल्‍या ऐकायला सिद्ध नव्‍हता. आत्‍मा त्‍याची पुष्‍कळ समजूत काढत होता; पण तो काही सिद्ध होत नव्‍हता. मग आत्‍मा मनाकडे गेला. त्‍याने मनाला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे येण्‍यासाठी विनंती केली. तेव्‍हा अंतर्मन आणि बाह्यमन आत्‍म्‍याला म्‍हणाले, ‘आम्‍ही येणारच होतो; पण या अहंने आम्‍हाला जाण्‍यास मनाई केली; म्‍हणून आम्‍ही आलो नाही. आता आम्‍ही येतो.’’ त्‍यानंतर आत्‍मा बुद्धीकडे गेला आणि त्‍याने बुद्धीला सांगितले, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर आले आहेत. तू चल. तुला ‘सात्त्विक बुद्धी’ व्‍हायचे आहे ना ? आपण परात्‍पर गुरुदेवांना शरण जाऊन शुद्ध होऊया.’ तेव्‍ही बुद्धी म्‍हणाली, ‘मी येण्‍यासाठी सिद्धच होते; पण या अहंने मला अडवले; म्‍हणून मी थांबले.’ त्‍यानंतर आत्‍मा आणि बुद्धी दोघे मिळून अहंकडे गेले अन् त्‍याला म्‍हणाले, ‘तू परात्‍पर गुरुदेवांकडे चल. आपल्‍यातील हट्टामुळे आपल्‍या अनेक जन्‍मांची हानी झाली आहे. आता आपल्‍याला माघार घेऊन परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी शरण जाऊन आणि त्‍यांना अपेक्षित असे घडून या जन्‍माचे सार्थक करून घ्‍यायचे आहे.’ असे समजावून सांगितल्‍यावर अहं यायला सिद्ध झाला. त्‍यानंतर ते सर्व जण परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे गेले आणि त्‍यांच्‍या समोर एका रांगेत बसले.

तेव्‍हा परात्‍पर गुरुदेवांनी त्‍यांच्‍याकडे पाहून स्‍मितहास्‍य केले. त्‍या वेळी आत्‍मा परात्‍पर गुरुदेवांना म्‍हणाला, ‘आम्‍ही सर्व जण तुम्‍हाला शरण आलो आहोत. तुम्‍ही आम्‍हाला शुद्ध करा. आम्‍हा सर्वांना तुम्‍हाला अपेक्षित असे घडायचे आहे. तुम्‍ही आम्‍हाला घडवा.’ त्‍या वेळी सर्व जण (मन, बुद्धी, अंतर्मन, बाह्यमन आणि अहं अन् सर्व इंद्रिये) परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी लीन झाले. तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर सर्वांकडे पाहून हसून आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.’

काही वेळाने ‘मी एका वाटेने चालत आहे’, असे मला दिसले. तेव्‍हा माझ्‍या पाठीमागून प.पू. भक्‍तराज महाराज यांची गाडी आल्‍याचे मला जाणवले. तेव्‍हा मी चालत असलेले पाहून प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) यांनी गाडी थांबवली आणि मला गाडीत घेतले (बसवले). तेव्‍हा प.पू. बाबा आणि इतर भक्‍त माझ्‍या समवेत माझ्‍या घरी आल्‍याचे मला जाणवले. त्‍या वेळी आमच्‍या घरी प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या भजनांचा कार्यक्रम झाल्‍याचे मला जाणवले. त्‍यानंतर माझी ग्‍लानी आणि थकवा एकदम न्‍यून होऊन मला पुष्‍कळ हलकेपणा जाणवू लागला. ‘मी आजारी असून झोपून आहे’, असे मला जाणवत नव्‍हते. त्‍यानंतर मी आवरून सेवेलाही गेले.

या आधी अशा प्रकारे इंद्रियांची मानसशुद्धी मी करू शकत नव्‍हते; पण ‘परात्‍पर गुरुदेवांनी माझ्‍याकडून इंद्रियांची मानसशुद्धी करवून घेतली’, याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.२.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक