हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘क्रांतीगाथा प्रदर्शन’

प्रदर्शन पहातांना लांजा येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी

रत्नागिरी, १५ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून या कार्याशी जोडलेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या साहाय्याने ६ ठिकाणी ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते. लांजा, रत्नागिरी, सावर्डे आणि चिपळूण या ठिकाणी हे प्रदर्शन लावण्यात आले.

‘क्रांतीगाथा प्रदर्शन’ लावण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या यज्ञात आहुती दिलेले क्रांतीकारक, त्यांचा पराक्रम, त्याग याविषयी माहिती सर्वांना व्हावी, हा होय. क्रांतीकारकांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती युवा वर्गाला मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ महाविद्यालयांतील १ सहस्र ११२ युवकांनी घेतला.

क्रांतीगाथा प्रदर्शनाविषयीचे मनोगत आणि हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग

प्रदर्शनातील माहिती लिहून घेतांना कुर्धे (रत्नागिरी) येथील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिंनी

प्रदर्शन पाहिल्यावर अनेकांनी  मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, यापूर्वी आम्हाला इतक्या वर्षात क्रांतीकारक म्हणजे कोण ? त्यांनी काय केले? हे ठाऊक नव्हते. समितीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला पुष्कळ माहिती मिळाली. ही माहिती आम्ही आमच्या मित्र परिवाराला सांगण्याचा प्रयत्न करू.

हे प्रदर्शन पाहून तेथे उपस्थित धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनीही अशा प्रकारचे प्रदर्शन त्यांच्या भागात लावण्याविषयीचा मानस व्यक्त केला, तसा प्रयत्नही काही जण करत आहेत.

अभिप्राय

१. क्रांतीकारकांची, तसेच वीरपुरुषांची आणि वीरांगणांची माहिती ऐकतांना अंगावरती रोमांच आले.

२. ज्या इंग्रजांनी आमच्या राष्ट्रावर अत्याचार केले, त्यांचे लांगूनचालन करणार नाही. ‘हॅलो’ ऐवजी ‘जय श्रीराम !’ म्हणणार असे मत अनेकांनी व्यक्त केले.

३. काही जणांनी आम्ही देव मानत नव्हतो; मात्र याच्यापुढे कुणाचाही फोन आला, तर ‘जय श्रीराम’ असेच म्हणणार, असे सांगितले.