सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शास्‍त्रशुद्ध माहिती मिळाल्‍याने मनुष्‍यजन्‍माचे सार्थक झाले, असे वाटणार्‍या चिंचवड, पुणे येथील सौ. जयश्री सुभाष जाधव (वय ७२ वर्षे) !

१. साधनेत येण्‍यापूर्वी

सौ. जयश्री जाधव

‘मी इतर संप्रदायानुसार कोणतीही साधना करत नव्‍हते. वर्ष १९९९ पासून माझे लहान बंधू ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्‍यांच्‍याकडून मी साधनेविषयी ऐकून होते; पण त्‍या वेळी माझ्‍या मनात साधनेविषयी ओढ निर्माण झाली नव्‍हती.

२. सनातन संस्‍थेशी संपर्क

‘वर्ष २००९ मध्‍ये मी मुख्‍याध्‍यापक पदावरून निवृत्त झाले. आम्‍ही वर्ष २०११ मध्‍ये लहान मुलाच्‍या नोकरीच्‍या ठिकाणी चिंचवड, पुणे येथे रहायला आलो. तेव्‍हा माझ्‍या मनात ‘निवृत्त झाल्‍यानंतर पुढे काय करायचे ? नवीन शहरात आल्‍यानंतर काय करायचे ?’, असे विचार येत असतांनाच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मी सनातन संस्‍थेशी जोडले गेले.

वर्ष २०१२ मध्‍ये मी सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी महाशिवरात्रीनिमित्त लावलेल्‍या प्रदर्शनकक्षावर गेले होतेे. तेथे एका सनातनच्‍या साधिकेची भेट झाली. पुण्‍यात आल्‍यानंतर मी प.पू. भक्‍तराज महाराज यांची (प.पू. बाबांची) भजने ऐकली. त्‍यांतून माझी भावजागृती होऊ लागली. ‘भाव म्‍हणजे काय ?’ हे मला समजू लागले. सनातनचे काही ग्रंथ वाचल्‍यानंतर मला साधनेविषयी ओढ वाटू लागली. मला चिंचवडमधील साधक भेटले. त्‍यामुळे मी सत्‍संग आणि बैठका यांना उपस्‍थित राहू लागले. मला साधकांचा सत्‍संग मिळू लागला आणि भावसत्‍संगही ऐकता येऊ लागला.

३. आनंदी जीवनासाठी स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया !

स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेविषयी माझ्‍या मनात पुष्‍कळ उत्‍सुकता निर्माण झाली. ती प्रक्रिया मला पुष्‍कळ आवडली. इतर कुठेच याविषयी काही शिकायला मिळत नाही. केवळ सनातन संस्‍थेत या प्रक्रियेविषयी सांगितले जाते आणि प्रत्‍यक्ष कृतीही करून घेतली जाते. ‘शिक्षिका म्‍हणून विद्यार्थ्‍यांशी संवाद साधतांना मला स्‍वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेचा पुष्‍कळ लाभ घेता आला असता’, असे विचार कित्‍येक वेळा मनात येतात. ही प्रक्रिया आनंदी जीवनासाठी आवश्‍यक असल्‍याची जाणीव निर्माण झाली.

४. साधना करण्‍याचा दृढनिश्‍चय होणे

कुटुंबातील सदस्‍य पुरोगामी आणि समाजवादी विचारांचे असले, तरी त्‍यांना सनातन संस्‍थेत सांगितलेली साधना समजावून सांगितली आणि कृतीला ९८ टक्‍के महत्त्व असल्‍याने ती त्‍यांना मन अन् बुद्धी यांद्वारे पटली. आता ‘उर्वरित आयुष्‍यात आनंद मिळवण्‍यासाठी कितीही अडथळे आले, तरीही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितलेली साधना करायची’, असे मी ठरवले आहे.

५. सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना केल्‍याने मनुष्‍यजन्‍माचे सार्थक झाल्‍यासारखे वाटणे

मनुष्‍यजन्‍माला येऊन नेमकेपणाने ‘आचार, विचार आणि वर्तन कसे असायला पाहिजे ?’, याची शास्‍त्रशुद्ध माहिती मिळाल्‍याने सनातन संस्‍थेत येऊन आपल्‍या मनुष्‍यजन्‍माचे सार्थक झाल्‍यासारखे वाटत आहे. आता माझ्‍या मनात ‘निवृत्ती नंतर काय करायचे ? वेळ कसा घालवायचा ?’, असे विचार येत नाहीत. राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी सेवा करतांना प्रत्‍येक वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त होते.

केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या कृपेने हे विचार मला लिहिता आले. माझी क्षमता नसतांनाही गुरुमाऊलीनेच माझ्‍याकडून हे लिहून घेतले. याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. जयश्री सुभाष जाधव (वय ७२ वर्षे), चिंचवड, पुणे.

(२६.३.२०२३)