पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – सोनसोडो येथील कचरा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी साळगाव प्रकल्पात आणण्यावरून सध्या तीव्र विरोध चालू आहे. १२ ऑगस्टला सकाळी ४ ट्रक सोनसोडो येथून पिळर्ण मार्गे कचरा घेऊन येत असतांना ग्रामस्थांनी त्यांना अडवले. यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सकाळी हे ट्रक कचरा वाहून नेत असतांना त्याच्यातून घाण पाणी रस्त्यावर सांडत होते. ही गोष्ट पिळर्ण येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने हे ट्रक अडवले. पिळर्ण पंचायतीचे उपसरपंच अजय गोवेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन निषेध नोंदवला. याविषयीची महिती मिळाल्यावर कचरा व्यवस्थापन मंडळाचे अभियंता धीरज चोडणकर संबंधित स्थळी पोचले आणि त्यानी पहाणी केली. या वेळी जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, साळगाव भाजप युवा समितीचे अध्यक्ष करण गोवेवर, सयाजी राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पिळर्ण पंचायत क्षेत्रातील रस्ते अरूंद असून ट्रकसारख्या अवजड वाहनांद्वारे नेल्या जाणार्या कचर्यातून दुर्गंधी येणारे पाणी सांडत असल्याविषयी कचरा व्यवस्थापन मंडळाकडे १४ ऑगस्ट या दिवशी तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे गोवेकर यांनी सांगितले.