मुख्यमंत्री आणि आमदार यांची अपर्कीती करणार्‍या पत्रकारावर गुन्हा नोंद करा !

जळगाव येथील आमदार किशोर पाटील समर्थकांचा पाचोरा पोलीस ठाण्यावर मोर्चा !

जळगाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार किशोर पाटील यांची अपर्कीती केल्याच्या प्रकरणी येथील पाचोरा (जिल्हा येथील) येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी आमदार किशोर पाटील समर्थकांच्या वतीने १२ ऑगस्ट या दिवशी येथे पाचोरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला आहे.

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ‘ऑडिओ क्लिप’ प्रसारित झाली होती. यानंतर ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. ‘आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केली आहे’, असा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला, तसेच त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगून पोलीस संरक्षणाची मागणीही केली होती.

दुसरीकडे आमदार किशोर पाटील म्हणाले की, आपण फक्त शिवीगाळ केली; मात्र मारहाण केली नाही. ज्याला जी भाषा कळते, त्याला त्याच भाषेत आपण उत्तर दिले आहे. पत्रकार संदीप महाजन हे खंडणीखोर पत्रकार आहेत. त्यांनी आता आमदार किशोर पाटील आणि मुख्यमंत्री यांची अपर्कीती करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.