(व्हीआयपी म्हणजे अतीमहनीय लोक)
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – अधिक मासानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील महादेवाच्या दर्शनासाठी प्रतिदिन भाविकांची गर्दी होत असून त्यातच अतीमहनीय व्यक्तींच्या (व्हीआयपी) दर्शनामुळे सामान्य भाविकांना याचा फटका बसत असल्याचे निदर्शनास येत होते. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक देवस्थान विश्वस्तांनी १२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र केंद्र आणि राज्य या स्तरांवरील राजशिष्टाचार म्हणून येणार्या अतीमहनीय पाहुण्यांना दर्शन दिले जाणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि आगामी काळात निज श्रावणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता वरील निर्णय घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.
१. त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी नाशिक जिल्हाधिकार्यांना व्हीआयपी दर्शन बंद करण्याविषयीचे पत्र दिले.
२. यावर जिल्हाधिकार्यांनी लेखी अथवा तोंडी आदेशाने व्हीआयपी दर्शनाची सुविधा देण्यासाठी त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती आणि मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांची नेमणूक करत आहे आणि त्यांच्या वतीने येणार्यांना व्हीआयपी दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे पत्र देवस्थानला दिले आहे.
३. दर्शनबारीतील भाविकांसाठी त्र्यंबक देवस्थान प्रशासनाने रांगेत उभे असलेल्या आबालवृद्धांसह लहान मुलांना राजगिरा लाडू, बिस्कीट पुडे आणि पाण्याची बाटली विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.