सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावातील गोठवेवाडी येथील डोंगरावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे येथे डोंगर खचून जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडण्यापूर्वी येथील ग्रामस्थांचे त्वरित पुनर्वसन करा, अन्यथा दुर्घटना घडून हानी झाल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
चार वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे, इतकी जुनी समस्या असूनही ग्रामस्थांना नोटिस देण्याव्यतिरिक्त इतर कांहीही उपाययोजना प्रशासनाकडून अद्याप झालेली नाही –
(सौजन्य : Konkan Samwad)
गोठवेवाडी येथे डोंगराळ भागात लोकवस्ती असून प्रतिवर्षी पावसाळ्यात डोंगर खचणे, भूमीला भेगा पडणे, लहान दरडी कोसळणे, असे प्रकार होऊन येथे जीवितहानी आणि वस्तीवरील घरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाकडून प्रतिवर्षी या भागात रहाणार्या कुटुंबांना नोटीस देण्यात येते. (नोटीस देणारे प्रशासन ग्रामस्थांचे पुनर्वसन का करत नाही ? – संपादक) या भागात ६ ऑगस्ट २०१९ या दिवशी भूस्खलनाची घटना घडली होती. त्याला ४ वर्षे पूर्ण झाली. याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे ग्रामस्थांनी तहसीलदार पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.