नागपूर – कोराडीतील नवीन प्रस्तावित वीज प्रकल्प रहित करावा, स्वतंत्र विदर्भ राज्य करावे, अशा मागण्यांसाठी आणि अन्नधान्यावरील जी.एस्.टी.च्या विरोधात ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट या दिवशी येथे ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानाबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निवासस्थानाच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
अमरावती मार्गावरील हॉकी ग्राऊंड परिसरात पोलिसांनी आंदोलकांना रोखले. पोलीस आणि आंदोलक यांच्यात रेटारेटी झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी संतप्त आंदोलकांना कह्यात घेत आपल्या वाहनातून नेले.