ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘आचार्य अत्रे’ पुरस्‍कार घोषित !

ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय वैद्य (डावीकडून तिसरे) यांचे संग्रहित चित्र

मुंबई, ९ ऑगस्‍ट (वार्ता.) – मुंबई मराठी पत्रकार संघाचा वर्ष २०२३ चा आचार्य अत्रे पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय वैद्य यांना ८ ऑगस्‍ट या दिवशी घोषित झाला आहे. यंदा आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती असून ऑगस्‍ट मासात महामहीम राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार त्‍यांना प्रदान करण्‍यात येणार आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्‍या पुरस्‍कार समितीची बैठक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष नरेंद्र वाबळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. त्‍यात सर्वानुमते वैद्य यांना हा पुरस्‍कार देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. विजय वैद्य ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रीय आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्‍यक्षपदही त्‍यांनी भूषवले होते. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे ते तीनदा अध्‍यक्ष होते. मुंबईच्‍या पश्‍चिम उपनगरात वाचनालय संस्‍कृती वाढवण्‍यात त्‍यांचा मोठा हातभार आहे. आचार्य अत्रे यांचे नातू अधिवक्‍ता राजेंद्र पै पुरस्‍कृत हा पुरस्‍कार रोख रक्‍कम, सन्‍मानचिन्‍ह, शाल आणि श्रीफळ अशा स्‍वरूपाचा आहे.