‘निर्विचार’ हा नामजप करतांना नामजपातील अक्षरांचा साधिकेला सुचलेला भावार्थ !

१. ‘निर्विचार’ या नामजपातील अक्षरांचे वेगवेगळ्‍या प्रकारे अर्थ लक्षात येणे

सौ. योगिता गोखले

‘१७.६.२०२१ या दिवशी मी पहाटे ५.२० वाजता नामजप करत होते. मी प.पू. भक्‍तराज महाराज यांंची भजने ऐकत मनात ‘निर्विचार’ असे म्‍हटले. तेव्‍हा मला त्‍यातील अक्षरांचे वेगवेगळ्‍या प्रकारे अर्थ सुचत गेले. ते येथे दिले आहेत.

१ अ. नि : ‘नित्‍य नूतनः सनातनः ।’, म्‍हणजे जे कधीही जुनेपुराणे होत नाही. जे शाश्‍वत आणि नित्‍य नवीन आहे.

१ आ. र्वि

१. ‘र्’ म्‍हणजे रफार. ‘र्’ या अक्षरातून ‘रहाणे, रमणे आणि रममाण होणे’, असे अर्थ लक्षात येतात. यातून ‘भगवंताच्‍या नामस्‍मरणात एकरूप होऊन जायचे आहे. यासाठी मन निर्विकल्‍प असायला हवे’, हे लक्षात येते.

२. ‘वि’ या अक्षराचे ‘विश्राम, विलसणे आणि प्रसन्‍न रहाणे’, असे अर्थ मनात येतात. ‘वि’ या अक्षरावरून ‘विशेषण’ या शब्‍दाचे स्‍मरण होते. विशेष कृती केली, तर त्‍या कृतीचे कौशल्‍य प्रकट होते. ‘वि’ हे अक्षर विलसत रहायला शिकवते. ‘वसति’चे ‘विलसत’ हे अलंंकारिक रूप आहे. ‘नामाने मनात वसति करणे’, म्‍हणजे निवास करणे, म्‍हणजेच सतत नामस्‍मरण होत रहाणे ! साधकांना नामाशी एकरूप होऊन जायचे आहे.

१ इ. चा : ‘चा’ हे अक्षर उच्‍चारल्‍यावर ‘चंद्र, चांदणे आणि चमकणे’, असे अर्थ मनात येतात. या वेळी मला ‘रामचंद्र’ हे नाव आठवले.

१ ई. र : ‘रं’ हे मूळ बीजाक्षर आहे. स्‍वाधिष्‍ठानचक्राला ६ पाकळ्‍या असून बं, भं, मं, यं, रं आणि लं ही त्‍यांची बीजाक्षरे आहेत.

र हे अक्षर उच्‍चारल्‍यावर मला ‘रवि’, या शब्‍दाची आठवण झाली. ‘रवि’ हा ‘सूर्य’ या शब्‍दाचा समानार्थी शब्‍द आहे. सूर्य हा सृष्‍टीचा पालनकर्ता आहे.

‘निर्विचार’ चा नामजप करतांना ‘त्‍यातील शब्‍दार्थ किती व्‍यक्‍त आणि अव्‍यक्‍त आहे’, हे लक्षात आले. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये लिहिले होते की, ‘एका अक्षराकडूनही आपल्‍याला ज्ञान मिळवता येते.’ खरेच देवाने आज ‘निर्विचार’ या शब्‍दाचा सोप्‍या आणि साध्‍या भाषेत अर्थ सांगितला. त्‍याबद्दल कोटीशः कृतज्ञता !

२. १७.६.२०२१ हा दिनांक, त्‍यातील आकडे, वार आणि तिथी यांचा सुचलेला अर्थ

पहाटे नामजप ऐकत मी वरील सूत्रे लिहित होते. त्‍या वेळी माझ्‍या मनात ‘आजचा (१७.६.२०२१) दिनांक, वार आणि तिथी’ यांविषयीची पुढील सूत्रे मनात आली.

२ अ. दिनांक १७.६.२०२१ चे वैशिष्‍ट्य

२ अ १.  १७ हा अंक : यातील ‘१७’ या अंकातील आकड्यांची बेरीज १ + ७ = ८ अशी होते. ८ हा अंक म्‍हणजे अष्‍टसिद्धी. साधनेमुळे अष्‍टसिद्धी प्राप्‍त होतात. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना अष्‍टांग साधना शिकवली आहे.

२ अ २. जून मास : ‘जून मास’ हा ६ वा मास असून हा अंक षडैश्‍वर्य गुणसंपन्‍न (ऐश्‍वर्यादी ६ गुण असलेल्‍या) भगवान श्रीकृष्‍णाचे ६ गुण म्‍हणजे ‘ऐश्‍वर्य’, ‘धर्म’, ‘यश’, ‘श्री (सौंदर्य)’, ‘ज्ञान’ आणि ‘वैराग्‍य’ दर्शवतो. विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊली या सर्व गुणांनी संपन्‍न आहेत. साधनेने काम-क्रोधादी षड्‌र्िपूंचा नाश होतो.

२ अ ३. वर्ष २०२१ : वर्ष ‘२०२१’ मधील सर्व आकड्यांची बेरीज २ + ० + २ + १ = ५ होते. ‘५’ हा अंक विश्‍वव्‍यापक आहे. पृथ्‍वी, आप (जल), तेज (अग्‍नि), वायु आणि आकाश ही पंचमहाभूते असून संपूर्ण जीवसृष्‍टी या पंचमहाभूतांवरच अवलंबून आहे. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रियेही ५ असतात.

२ अ ४. दिनांक १७.६.२०२१ : १७ + ६ + २०२१ = १९. ‘१९’ मधील आकड्यांची बेरीज केल्‍यास ‘१०’ हा अंक येतो. त्‍या वेळी मला ‘दशदिशा’ या शब्‍दाची आठवण आली. तेव्‍हा दशावतारांची (मत्‍स्‍य, कूर्म, वराह आदी) नावेही आठवली आणि श्रीकृष्‍णाचे विश्‍वरूपही डोळ्‍यांपुढे आले.

२ आ. तिथी : १७.६.२०२१ ची तिथी ज्‍येष्‍ठ शुक्‍ल सप्‍तमी आहे. ‘सप्‍तमी’ हा शब्‍द उच्‍चारल्‍यावर सप्‍तर्षी आणि ७ वार यांची आठवण होते.

२ इ. वार : आज गुरुवार. या वाराला ‘भृगुवासरे’ म्‍हणतात. ‘भृगु’ हे ऋषींचे नाव असून ते शुभ आहे. गुरुवार हा गुरूंचा वार आहे.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍याकडून ‘निर्विचार’ या शब्‍दाचा आणि १७.६.२०२१ या दिनांकाचा भावार्थ लिहून घेतला. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या पावन चरणी नतमस्‍तक होऊन कोटीशः कृतज्ञता ! ‘प्रत्‍येक श्‍वासागणिक आम्‍हाला नामाचे अखंड स्‍मरण होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– सौ. योगिता गोखले, गोवळ, राजापूर, रत्नागिरी. (१७.६.२०२१)