१. चांगली मैत्रीण
‘आम्ही दोघी (मी आणि मंदा (पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार)) ‘डी.एड्.’ला एकत्र शिकत होतो. त्यानंतर आम्ही दोघींनी एकाच ठिकाणी नोकरी केली. तेव्हापासून मंदा माझी चांगली मैत्रीण झाली.
२. आवड नावड नसणे
मंदाला खाण्या-पिण्याची विशेष आवड नाही. जेवतांना ‘भाजीत मीठ अल्प आहे’, हेसुद्धा तिच्या लक्षात येत नाही; पण ती स्वयंपाक आणि इतर पदार्थही पुष्कळ छान बनवते.
३. सनातन संस्थेचा सत्संग पुष्कळ आवडणे आणि तेव्हापासून नियमित सत्संगाला जाणे
शाळेत नोकरी करत असतांना आम्हाला ‘चांगले काहीतरी मिळावे’, असे वाटायचे; म्हणून आम्ही दोघी योग आणि बिंदूदाबन (अॅक्युप्रेशर) शिबिराला जायचो. एक दिवस आम्हाला कळले, ‘मंदाच्या घराजवळ सनातन संस्थेचा सत्संग आहे.’ सायंकाळी आम्ही दोघी त्या सत्संगाला गेलो. आम्हाला सत्संग पुष्कळ आवडला. तेव्हापासून आम्ही नियमित सत्संगाला जाऊ लागलो.
४. सत्संगामुळे मनातील नकारात्मक विचार आणि अपेक्षा न्यून होणे
साधनेत येण्यापूर्वी मंदाच्या मनात नकारात्मक विचार यायचे. तिच्या मनात ‘मी या घरात केवळ सगळ्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यासाठी आहे’, असे विचार येत असत. मंदाचे यजमान पूर्णवेळ नोकरीसाठी देत असत. त्यांच्या मनात २४ घंटे नोकरी संदर्भातीलच विचार असत. याचे पूर्वी मंदाला पुष्कळ वाईट वाटत असे; परंतु सत्संग मिळाल्यामुळे तिच्या मनातील हे विचार न्यून झाले.
५. दिवाळीची भेट म्हणून नातेवाइकांची ‘सनातन प्रभात’ची वर्गणी भरणे आणि ‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे नातेवाइकांनी साधनेला आरंभ करणे
सत्संग आवडल्यामुळे मंदा नातेवाइकांना सत्संगाची माहिती सांगायची. सनातन संस्थेशी संपर्क झाल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीत तिने काही नातेवाइकांची ‘सनातन प्रभात’ची वर्गणी भरली. त्यामुळे तिच्या सर्व बहिणी आणि भाऊ यांनी साधनेला आरंभ केला.
६. घरातून विरोध असूनही सत्संगाचे महत्त्व मनावर बिंबल्यामुळे कठीण परिस्थितीतही सत्संग घेणे
आरंभी मंदाला तिच्या घरी नामजप करण्यासही विरोध व्हायचा. सत्संगात आम्हाला सेवेचे महत्त्व कळले. आम्ही शाळा सुटल्यानंतर २ घंटे ओळखीच्या लोकांकडे जाऊन प्रसार करायचो आणि नंतर घरी जायचो. असे करता करता मंदाने सत्संग घ्यायला आरंभ केला. मंदामध्ये शिकण्याची तळमळ पुष्कळ आहे. तिच्या मनावर सत्संगाचे महत्त्व इतके बिंबले होते की, तिच्या मनात ‘ऊन, पाऊस किंवा थंडी असली, तरी सत्संग घ्यायचाच’, असा विचार असायचा. तिने ‘सत्संग घेतला नाही’, असे कधीही झाले नाही. तिची मुले अमित आणि मयुरी लहान असल्यापासून सत्संगाला येत आहेत. (आता तिची दोन्ही मुले पूर्णवेळ साधना करत आहेत.)
७. व्यष्टी साधनेत सातत्य असणे
मंदा स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणी अन् शिकायला मिळालेली सूत्रे नियमित लिहिते. तिच्यामध्ये चिकाटी हा गुण आहे.
८. परेच्छेने वागणे
मंदाच्या यजमानांचे सहलीला बाहेर फिरायला जायचे नियोजन असायचे; पण मंदाला कुठेही जायला आवडत नसे; पण ‘परेच्छा’ समजून ती कधी कधी सहलीला जात असे.
९. सेवेची तीव्र तळमळ असल्यामुळे घरातील दुःखद प्रसंगीही परिपूर्ण सेवा करणे
तिला सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे. तिला ‘मिळालेली सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, असा ध्यास असतो.
अ. मंदाचे वडील रुग्णाईत होते. तेव्हा ‘सत्संग आहे’; म्हणून ती तिच्या वडिलांना भेटायला गेली नाही. नंतर तिच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा ती सत्संग घ्यायला गेली होती. सत्संगानंतर ती जिज्ञासूंना संपर्क करून घरी आली. तेव्हा घरी आलेल्या नातेवाइकांनी तिला तिच्या वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले. तेव्हा घरचे सर्व आवरून ती माहेरी गेली.
आ. ‘जुलै २००० मध्ये मंदाच्या सासर्यांचे निधन झाले’, तेव्हा तिला प्रवचन करण्याची सेवा होती. तिने प्रवचनाची सेवा रद्द न करता प्रवचन केले. त्यानंतर तिने तिच्याकडील गुरुपौर्णिमेच्या पावती पुस्तकाचा हिशोब पूर्ण केला. तिच्याकडील सर्व सेवा पूर्ण करून गावी गेली आणि तिसर्या दिवशी ती घरी परत आली. त्या वेळी गुरुपौर्णिमा असल्याने ती प्रसारसेवा करू लागली.
देवाने मला अशी आध्यात्मिक मैत्रीण दिली. यासाठी मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती सुमती सरोदे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), वाराणसी आश्रम (२.२.२०२१)