कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामांचा आज प्रारंभ होणार

कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांचा समावेश

कोकण रेल्वे

कणकवली – कोकण रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या रेल्वेस्थानकांना जोडणार्‍या रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती यांची कामे अनेक वर्षे न झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील एकूण ३७ रेल्वेस्थानकांपैकी १२ रेल्वेस्थानकांना जोडणारा रस्ता चांगल्या दर्जाचा असावा, तसेच रेल्वेस्थानकांचा परिसर सुशोभित आणि अधिक दर्जेदार करण्यात यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.

यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या कामांचा ‘ऑनलाईन’ शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ८ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता होणार आहे.

 (सौजन्य : TV9 Marathi)

रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण; मात्र ‘अमृत भारत’ योजनेत एकाही स्थानकाचा समावेश नाही

‘अमृत भारत रेल्वेस्थानक विकास योजने’च्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात २५ सहस्र कोटी रुपये खर्चून देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा विकास ‘विमानतळा’च्या धर्तीवर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे भूमीपूजन केले आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ३८ रेल्वेस्थानकांचा समावेश आहे; मात्र त्या ३८ स्थानकांत कोकणातील एकाही रेल्वेस्थानकाचा समावेश नसल्यामुळे कोकणवासियांतून संताप व्यक्त केला जात आहे.