‘सीमा’वाद आणि पाकिस्‍तानचे षड्‌यंत्र !

‘शीर्षक वाचून आपल्‍या लक्षात आलेच असेल, एक तथाकथित प्रेमप्रकरण (सीमा हैदर आणि सचिन मीणा यांचे) सध्‍या सगळीकडे चर्चेत आहे. वृत्तवाहिन्‍या, सामाजिक माध्‍यमे आदी सर्वांनाच सीमा हैदर प्रकरणाने झपाटलेले आहे. सीमा हैदर नावाची पाकिस्‍तानी महिला स्‍वतःच्‍या ४ मुलांसह तिच्‍या प्रियकरासाठी नेपाळहून अवैध मार्गाने भारतात येते. केवळ येते, एवढेच नव्‍हे, तर भारताची नागरिकता मिळवण्‍यासाठी राष्‍ट्रपतींकडे दयायाचनाही करते  ! विशेष म्‍हणजे प्रशासनाला जाग येण्‍यापूर्वी भारतीय प्रसिद्धीमाध्‍यमे आणि स्‍थानिक तिला ‘सेलिब्रेटी’ (वलयांकित व्‍यक्‍ती) ठरवतात. या सगळ्‍या प्रकरणाला ‘सीमेपलीकडील प्रेम’ (लव्‍ह विदाऊट बॉर्डर्स), असे एक गोंडस नाव दिले जाते.

‘गदर’ या हिंदी चित्रपटातील प्रेमाच्‍या गोष्‍टीचा संदर्भ देत ही बाई भारतात शिरते. हे सगळे नाट्य बेमालूमपणे घडते. ‘सीमा हैदर ही पाकिस्‍तानच्‍या ‘आय.एस्.आय.’ची हस्‍तक (एजंट) नसेल कशावरून ?’, असा सर्वसामान्‍य जनतेच्‍या मनात उभा राहिलेला प्रश्‍न आहे.

सचिन मीणा आणि सीमा हैदर

१. सीमा हैदर प्रकरण, हे ‘छद्मी’ षड्‌यंत्र?

नुकत्‍याच प्रसिद्ध झालेल्‍या भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या अहवालानुसार भारताची परकीय गंगाजळी जवळपास ६०० बिलियन डॉलरच्‍या पुढे गेली आहे. संपूर्ण पाकिस्‍तानची किंमतही तेवढी नसेल, इतकी आपली (भारताचा) केवळ परकीय गंगाजळी आहे. वर्ष १९४८ ते १९९९ या कालावधीत इस्‍लामिक रिपब्‍लिक ऑफ पाकिस्‍तानने भारताशी ४ वेळा उघड आणि छुपे युद्ध करून पाहिले; परंतु प्रत्‍येक युद्धात भारतीय सेनेने पाकिस्‍तानचे कंबरडे मोडले आहे. त्‍यामुळे आपण भारतीय सैन्‍याशी समोरासमोर लढणे तर दूरच, साध्‍या बंदुकीच्‍या गोळ्‍याही आपल्‍याकडे उपलब्‍ध नाहीत, याची संपूर्ण कल्‍पना पाकिस्‍तानला आहे; म्‍हणूनच अशा नानाविध प्रकारची षड्‌यंत्रे पाकिस्‍तान नेहमीच रचत आला आहे. सीमा हैदर हा त्‍या छद्मी षड्‌यंत्राचा भाग नसेल कशावरून ?

२. कोण आहे सीमा हैदर ?

सीमा हैदरच्‍या म्‍हणण्‍यानुसार ती मूळची पाकिस्‍तानच्‍या सिंध प्रांतातील रहिवासी असून तेथेच तिचे ५ वीपर्यंतचे शिक्षण झाले आणि वर्ष २०१४ मध्‍ये गुलाम हैदरशी तिचा प्रेमविवाह झाला. घरच्‍यांच्‍या विरोधामुळे गुलाम हैदरने सीमाशी न्‍यायालयीन विवाह (कोर्ट मॅरेज) केला होता. वयाच्‍या १५ व्‍या वर्षीच तिला पहिले अपत्‍य झाले. त्‍यानंतर ती ४ मुलांची आईही झाली. त्‍यानंतर वर्ष २०१९ मध्‍ये तिचा नवरा कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला.

वर्ष २०१९ मध्‍ये भ्रमणभाषद्वारे ऑनलाईन ‘पबजी’ खेळतांना सीमाने प्रथमच भारतातील उत्तरप्रदेशच्‍या गौतम बुद्ध नगरमधील सचिन मीणासोबत ‘ऑनलाईन’ खेळायला प्रारंभ केला. दोघांमध्‍ये बोलणे वाढले आणि जवळीक वाढली. पुढे सीमाला पारपत्र मिळाल्‍यावर ती ‘पर्यटक व्‍हिसा’ मिळवून युनायटेड स्‍टेट्‌स अमिराती मार्गे नेपाळला आली आणि तेथे तिची सचिनशी पहिली भेट झाली. पहिल्‍याच भेटीत १३ मार्चला दोघांनी पशुपतीनाथ मंदिरात हिंदु पद्धतीने लग्‍न केले. त्‍यानंतर सीमा पुन्‍हा १७ मार्चला कराचीला गेली, ती भारतात येण्‍याच्‍या आणाभाका घेऊनच !

पुढे सीमाने पाकिस्‍तानमधील स्‍वतःची स्‍थावर मालमत्ता १४ लाखांना विकून ती कराचीमधून भारताकडे यायला निघाली. तेव्‍हा तिच्‍याकडे केवळ ३०० डॉलर, म्‍हणजे २५ सहस्र भारतीय रुपये उरले होते. पुढे ती १० मे या दिवशी दुबईमार्गे काठमांडूला ४ मुलांसह पोचली. पुढे तिने काठमांडू ते देहली व्‍हाया पोखरा असा प्रवास केला. ती १३ जुलैच्‍या रात्री यमुना द्रुतगती मार्गावर उतरली, जिथे सचिन तिची वाट पहात होता. या संपूर्ण प्रकरणात सीमा आपण नेपाळहून भारतापर्यंत अवैधरित्‍या प्रवास केल्‍याचे मान्‍य करते.

३. सीमाला ‘सती-सावित्री’ म्‍हणणार्‍या सामाजिक माध्‍यमांची दायित्‍वशून्‍यता !

सामाजिक माध्‍यमांवर सीमा हैदरचे धाडस, प्रेम यांचे गुणगान करतांना तिला ‘सती-सावित्री’, ‘आदर्श भाभी’, अशा सगळ्‍या विशेषणांनी ‘गौरवले’ गेले. तिचा आधीचा नवरा असणार्‍या गुलाम हैदरने तिला आणि त्‍याच्‍या मुलांना सोपवण्‍याची मागणी भारत सरकारकडे केली. तिच्‍या मागणीसाठी पाकिस्‍तानमधून भारताला धमक्‍याही आल्‍या, तसेच तेथील इस्‍लामिक माफियांच्‍या टोळ्‍यांकडून हिंदूंची मंदिरेही रॉकेट डागून पाडण्‍यात आली. ‘इतके होऊनही सीमा आपले सर्वस्‍व सोडून भारतात तिच्‍या प्रियकराकडे आली आहे. त्‍यामुळे तिचा त्‍याग मोठा आहे’, असे काही जण म्‍हणतात; म्‍हणूनच देशाच्‍या सुरक्षिततेपेक्षा त्‍यांना ‘देशाने तिचा स्‍वीकार करावा’, असे वाटते.

सचिन आणि सीमा कायदेशीरदृष्‍ट्या लग्‍न करण्‍यासाठी नोएडातील एका अधिवक्‍त्‍यांकडे गेले. त्‍या दोघांची कागदपत्रे पडताळल्‍यावर सीमाच्‍या ‘शिनाख्‍ती कार्ड’ (पाकिस्‍तानचे आधारकार्ड)वरून ती पाकिस्‍तानी नागरिक असल्‍याचे अधिवक्‍त्‍याच्‍या लक्षात आले. त्‍याने तात्‍काळ नोएडा पोलिसांना माहिती दिल्‍याने त्‍या दांपत्‍याला अटक करण्‍यात आली. सीमावर व्‍हिसा नसतांना भारतात प्रवेश करण्‍याचा आरोप करण्‍यात आला. पुढे न्‍यायालयीन प्रक्रियेने ७ जुलै या दिवशी त्‍या दोघांना जामीन मिळाला. सीमाला ३० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला, तसेच न्‍यायालयाने ‘हे प्रकरण चालू असेपर्यंत सीमा रहाण्‍याची जागा पालटू शकत नाही आणि न्‍यायालयाच्‍या पूर्वअनुमतीखेरीज देश सोडू शकत नाही’, अशा अटी घातल्‍या.

४. भारतीय नागरिक म्‍हणून उपस्‍थित होणारे काही प्रश्‍न

सीमा खरच आय.एस्.आय.ची गुप्‍तहेर आहे का ? याचे अन्‍वेषण उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथक करत आहे. तरीही एक सजग भारतीय नागरिक म्‍हणून आपल्‍या मनात काही प्रश्‍न उभे रहातातच.

अ. सामाजिक माध्‍यमांवर ‘मरियम खान’ नावाने खाते उघडणार्‍या सीमाने ‘सीमा’ हे हिंदु नाव जाणीवपूर्वक धारण केले आहे का ?

आ. सीमाच्‍या सांगण्‍यानुसार तिचे शिक्षण पाकिस्‍तानमधील शिक्षण पद्धतीच्‍या ५ वीपर्यंत झाले आहे; परंतु ध्‍वनीचित्रकासमोर तिचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतील व्‍यवस्‍थितपणे बोलणे पाहून हे खोटे वाटते. हे तिला विशेष प्रशिक्षण मिळाल्‍याखेरीज अशक्‍यप्राय वाटत नाही का ?

इ. आपल्‍यापेक्षा ४ वर्षांनी लहान असलेल्‍या सचिनशी संसार चालू केल्‍याबरोबर तिचे उत्तरभारतातील हिंदु परंपरेप्रमाणे साडी नेसणे, डोक्‍यावरून पदर घेणे, कुंकू लावणे, तुळशीची पूजा करणे, हे सर्व आश्‍चर्यकारक वाटते. ९६ टक्‍के मुसलमान लोकसंख्‍या असलेल्‍या कराचीत वाढलेली सीमा प्रशिक्षणाखेरीज अशा हिंदु परंपरा पाळणे अशक्‍यप्राय वाटत नाही का ?

ई. सीमाकडून पोलिसांनी ४ भ्रमणभाष संच, पाकिस्‍तानची ५ अधिकृत पारपत्रे, तसेच एक कोरे पारपत्रही जप्‍त केले. पारपत्राविषयी चौकशीत तिने सांगितले की, नेपाळचा ‘व्‍हिसा’ मिळण्‍यासाठी सीमा गुलाम हैदर नावाने आवेदन केले होते. व्‍हिसा न मिळाल्‍याने तिने पुन्‍हा केवळ सीमा नावाने आवेदन केले. हे संशयास्‍पद नव्‍हे का ?

उ. उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाच्‍या चौकशीत असेही समोर आले की, सीमाने ज्‍यांच्‍याशी संपर्क साधला, तो सचिन पहिला नाही. याआधीही सीमाने भारतातील काही लोकांशी पबजी खेळण्‍याच्‍या निमित्ताने संपर्क साधला होता, ज्‍यांतील बहुतांश जण देहली आणि राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्रातील (‘एन्.सी.आर्.’मधील) होते. सीमाला भारताची राजधानी असलेल्‍या देहली आणि राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्रामध्‍ये एवढा रस का असावा ?

ऊ. कराची-दुबई-काठमांडू -पोखरा-देहली हा प्रवास सीमाने तिच्‍या ४ मुलांना घेऊन कोणत्‍याही पुरुषाविना केला. विशेषतः काठमांडू ते देहली हा रस्‍त्‍याने केलेला प्रवास एकट्या ५ वी उत्तीर्ण झालेल्‍या पाकिस्‍तानी महिलेसाठी अशक्‍यप्राय वाटतो. त्‍यातही भारताच्‍या सीमेत कोणत्‍याही वैध कागदपत्रांविना ५ जणांनी केलेला प्रवेश मनाला पटत नाही. भारत-नेपाळ सीमेवर तिला नक्‍कीच एखाद्या दलालाचे संरक्षण असले पाहिजे आणि हा दलाल केवळ पर्यटक दलाल नसून आय.एस्.आय्.चा हस्‍तक असावा, अशी दाट शंका येत नाही का ?

ए. सीमाच्‍या ४ मुलांचा सांभाळ किराणा दुकानात काम करून उदरनिर्वाह करणारा आणि मासिक १४ सहस्र रुपये कमावणारा सचिन कसा करणार आहे ? सीमाच्‍या हे लक्षात आले नसेल ? कि भारतीय गुप्‍तचर यंत्रणांना संशय येऊ नये; म्‍हणून आय.एस्.आय्.ने सीमाला ४ मुलांसह भारतात पाठवले आहे ?

ऐ. सीमाने या प्रवासाच्‍या वेळी नेपाळमधून दुसर्‍यांकडून इंटरनेट घेऊन सचिनशी संपर्क साधलेला आहे. यावरून तिची आधुनिक तंत्रज्ञानाशी असलेली ओळख आणि चलाखीचा प्रत्‍यय येतो. ही एखाद्या गुप्‍तचराला साजेशी चलाखी नव्‍हे का ?

ओ. वृत्तवाहिन्‍यांच्‍या ध्‍वनीचित्रकाच्‍या समोर सीमाचे बेधडक उत्तरे देणे, काही वेळा पत्रकारांना प्रतिपक्ष करणे, वेळ पडल्‍यास रडणे, चेहरा भोळाभाबडा करणे आणि भारतीय नागरिकत्‍वासाठी अगदी भारताच्‍या राष्‍ट्रपतींकडे आर्जव करणे, हे ती ५ वी उत्तीर्ण आणि मुसलमान वातावरणात वाढलेल्‍या महिलेचे मुळीच लक्षण नाही. यातून सीमा धूर्त वाटते. हा धूर्तपणा आय.एस्.आय्.ने शिकवला नसेल कशावरून ?

औ. पाकिस्‍तानमधून अनेक पाकिस्‍तानी मुसलमान नागरिक अधिकृत मार्गाने भारतात येतात; मात्र व्‍हिसा संपला, तरी तिकडे परतत नाहीत. अनेक वेळा भारतीय यंत्रणांना त्‍यांचा सुगावाही लागत नाही. सचिन आणि सीमा लग्‍न कायदेशीर पद्धतीने न करता एकत्र राहिले असते, तर सीमाचे बिंग कधीच फुटले नसते. अशा किती सीमा हैदर भारतात सुखाने नांदत असतील, याची नुसती कल्‍पनाही झोप उडवणारी आहे. अशा भारतात लपलेल्‍या अनेक ‘सीमां’वरून लक्ष हटवण्‍यासाठी आय.एस्.आय्.ने सुनियोजितपणे ‘सीमा हैदर कांड’ घडवून तर आणले नसेल ना ?

सीमा हैदरचे सत्‍य आतंकवादविरोधी पथक लवकरच शोधून काढेल; मात्र तिची चौकशी करणे, हे अन्‍वेषण यंत्रणेला आवश्‍यक वाटते, यातच सर्व काही आले.

५. पाकचे छद्मी षड्‌यंत्र ओळखण्‍यासाठी अखंड सावधान रहावे !

गेल्‍या १० वर्षांत पाकिस्‍तानच्‍या जिहादी आणि आतंकवादाच्‍या विविध पद्धती जगभरात उघड झाल्‍या आहेत. आता भारताविरुद्ध आतंकवादी कारवाई करणे, म्‍हणजे स्‍वतःचा आत्‍मघात, हे पाकिस्‍तानने कधीच ओळखले आहे; म्‍हणूनच पाकने भारताविरुद्ध सायबर वॉर (संगणकीय स्‍तरावरील युद्ध), सामाजिक माध्‍यम, ‘हनी ट्रॅप’ (शत्रूकडून महिलांच्‍या माध्‍यमातून महत्त्वाच्‍या पदांवरील व्‍यक्‍तींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवणे) असे नाना प्रकारचे छद्मी युद्धतंत्र अवलंबले आहे. समोरासमोर लढण्‍याची लायकी नसल्‍याने, तसेच आत्‍मनिर्भर भारताची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून फुटीच्‍या उंबरठ्यावर असलेला पाकिस्‍तान पुरता वैतागलेला आहे; म्‍हणूनच पाकला महिलांच्‍या बुरख्‍याआडून छद्मी षड्‌यंत्र राबवावे लागत आहे. हे सर्व पहाता समर्थ रामदासस्‍वामी म्‍हणतात त्‍याप्रमाणे आपण ‘अखंड सावधान असावे’, हे मात्र निश्‍चित !’

(साभार : ‘विश्‍व संवाद केंद्र’चे संकेतस्‍थळ, २७.७.२०२३)

संपादकीय भूमिका 

देशात संशयास्‍पदरित्‍या घुसलेल्‍या शत्रूदेशाच्‍या महिलेला सरकारने तात्‍काळ देशाबाहेर हाकलावे !