स्‍त्रियांना छळणारे काही अपसमज !

१. बाहेरच्‍या स्‍वच्‍छतागृहांमुळे जंतूसंसर्ग होतो, हा सर्वांत मोठा अपसमज !

‘बाहेरची स्‍वच्‍छतागृहे वापरल्‍यामुळे जंतूसंसर्ग होतो’, असा अपसमज आहे. या चुकीच्‍या समजुतीपायी पुष्‍कळ स्‍त्रिया त्‍यांची हानी करून घेतात. स्‍वच्‍छतागृहे कितीही घाण असली, तरी त्‍यामुळे स्‍त्रियांना जंतूसंसर्ग होऊ शकत नाही; कारण हे संसर्ग हवेतून पसरत नाहीत. बहुतेक स्‍त्रिया स्‍वच्‍छतागृहात कुठेही स्‍पर्श न होऊ देता मूत्रविसर्जन करू शकतात. असे असतांना ‘टॉयलेट’मध्‍ये जावे लागू नये; यासाठी त्‍या पाणी अल्‍प पितात आणि लघवीला जाणे आवश्‍यक असतांना तिचा वेग दाबून ठेवतात. ही लघवीच्‍या जंतूसंसर्गाची मुख्‍य कारणे आहेत. दाबून ठेवलेल्‍या लघवीमध्‍ये पुष्‍कळ लवकर जंतूसंसर्ग होतोे. याविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे. वास्‍तविक सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहे भारतीय पद्धतीची असणे स्‍त्रियांच्‍या आरोग्‍यासाठी अधिक हितकारक आहे. ती स्‍वच्‍छ ठेवणेही सोपे जाते.

२. अल्‍प पाणी प्‍यायल्‍याने जंतूसंसर्गाचा अधिक धोका ! 

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

 

पाणी अल्‍प प्‍यायची सवय असेल, तर मूत्रमार्ग कोरडा पडण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे मूत्रमार्गाची प्रतिकारशक्‍ती न्‍यून होते. त्‍यामुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. स्‍त्रियांनी प्रतिदिन ८ ते १० पेले पाणी पिणे आवश्‍यक आहे. पावसाळ्‍यात किंवा वातानुकूलीत वातावरणामध्‍ये काम करणार्‍या स्‍त्रियांना तहान लागलेली जाणवत नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून अल्‍प पाणी प्‍यायले जाते.

३. जंतूसंसर्ग झाल्‍यास स्‍त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्‍या !

मूत्रमार्गात (युरीन इन्‍फेक्‍शन) आणि योनीमार्गात होणारा जंतूसंसर्ग यांची लक्षणे बर्‍याच वेळा सारखी असतात. अशा वेळी स्‍त्रिया स्‍त्रीरोगतज्ञांकडे न जाता परिचयाच्‍या आधुनिक वैद्यांकडून तपासणी करून घेतात. कधी कधी तर त्‍या ‘केमिस्‍ट’कडून तात्‍पुरती औषधे घेणे, हे त्‍यांच्‍यासाठी हानीकारक ठरू शकते. त्‍यामुळे रुग्‍णाला अनावश्‍यक त्रास सहन करावा लागू शकतो.

– डॉ. शिल्‍पा चिटणीस जोशी, स्‍त्रीरोग आणि वंध्‍यत्‍व तज्ञ, कोथरूड, पुणे.

(साभार : फेसबुक)