हानीकारक अहंकार !

प्रत्‍येक क्षेत्रात शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहिल्‍यासच भौतिक आणि आध्‍यात्मिक प्रगती होऊ शकते !

इंग्रजांनी जगातील ज्‍या देशांवर राज्‍य केले, तेथे त्‍यांनी त्‍यांची संस्‍कृती, परंपरा, खेळ आदी नेले; मात्र मोजक्‍याच देशांनी इंग्रजांचे राज्‍य गेल्‍यावर त्‍यातील काही गोष्‍टी स्‍वीकारल्‍या, तर अनेकांनी अस्‍मिता म्‍हणून नाकारल्‍या. इंग्रजांनी ज्‍या खेळांचा प्रसार केला, त्‍यातील क्रिकेटचा स्‍वीकार काही मोजक्‍याच आणि त्‍यातही भारताने केला. पूर्वी इंग्रजांचे राज्‍य असणारा भारत, पाकिस्‍तान, बांगलादेश, श्रीलंका, वेस्‍ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, केनिया आदी देशांमध्‍ये क्रिकेट खेळले जाते. अन्‍यही देशांत किक्रेट खेळले जात असले, तरी त्‍यांना आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट संघटनेची मान्‍यता मिळालेली नाही किंवा ते आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर क्रिकेट खेळण्‍यासाठी पात्र झालेले नाहीत. ज्‍या देशांमध्‍ये भारतातून लोक नोकरी आणि व्‍यवसाय यांसाठी गेले, तेथेही त्‍यांनी क्रिकेट नेले. काही दशकांपूर्वी भारतात क्रिकेट खेळाडूंना पुष्‍कळ काही मानधन मिळत नव्‍हते; मात्र भारताने वर्ष १९८३ मध्‍ये विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धा जिंकल्‍यानंतर भारतातील क्रिकेट खेळाडूंना सुगीचे दिवस आले आणि आज जगात अशी स्‍थिती आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्‍हणजेच बीसीसीआय आणि भारतीय खेळाडू अन्‍य देशांचे क्रिकेट मंडळ अन् खेळाडू यांच्‍यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत. गेल्‍या काही वर्षांपासून देशात चालू असलेल्‍या ‘इंडियन प्रिमिअर लीग’ (आयपीएल) सारख्‍या स्‍पर्धेतून क्रिकेट खेळाडूंना प्रचंड पैसा मिळत आहे. विज्ञापनांमधूनही खेळाडूंना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. कोणतीही नोकरी किंवा व्‍यवसाय यांतून पैसा कमवणे चुकीचे नाही; मात्र या पैशाचा जेव्‍हा अहंकार होतो, तेव्‍हा तो व्‍यक्‍ती, समाज आणि पुढे देश यांसाठी हानीकारक ठरतो. पैशाचाच नव्‍हे, तर कुठल्‍याही गोष्‍टीचा अहंकार हा हानीकारकच असतो. अहं नष्‍ट केल्‍यावरच देव मिळतो. याच अहंकारावरून भारताचे ज्‍येष्‍ठ क्रिकेट खेळाडू कपिल देव यांनी मत मांडले आहे. ‘भारतीय क्रिकेट खेळाडूंना सध्‍या प्रचंड पैसा मिळत असल्‍याने त्‍यांच्‍यात अहंकार वाढला असून त्‍याचा परिणाम त्‍यांच्‍या खेळावर आणि पर्यायाने देशावर होत आहे. त्‍यांच्‍यामुळे देश कोणतीही स्‍पर्धा जिंकू शकत नाही’, असा दावा त्‍यांनी केला आहे. ‘हे खेळाडू वरिष्‍ठांच्‍या अनुभवाचा लाभ घेत नाहीत. या वरिष्‍ठांकडे जाऊन स्‍वतःच्‍या खेळातील उणिवा जाणून त्‍या दूर करण्‍यासाठी विचारणा करत नाहीत’, असेही देव यांनी म्‍हटले आहे. यातून हेच लक्षात येते की, व्‍यक्‍ती कितीही मोठी झाली, तिला कितीही यश मिळाले, लौकिक मिळाला, तरी त्‍याने नेहमी शिकण्‍याच्‍याच स्‍थितीत असले पाहिजे. या स्‍थितीमुळे अहंकाराला थारा मिळत नाही आणि नम्रतेत राहून अधिक प्रगती साध्‍य करता येते, हे लक्षात येते. भारतीय जनतेमध्‍ये क्रिकेटविषयी प्रचंड प्रेम आहे. क्रिकेटसाठी देशातील जनता बराच वेळ खर्च करत असते; मात्र यात भारतासाठी म्‍हणून खेळणार्‍या खेळाडूंमध्‍ये कपिल देव म्‍हणतात तसा अहंकार असेल आणि त्‍यामुळे देशाचीही हानी होत असेल, तर अशा खेळाडूंना त्‍यांची जागा दाखवून देण्‍याचाही प्रयत्न जनतेने वैध मार्गाने करणे आवश्‍यक आहे, असे कुणालाही वाटेल.

चरितार्थासाठी पैसा हवा ! 

भारतात क्रिकेटपटूंना जितका पैसा मिळतो, तितका पैसा देशातील अन्‍य कोणत्‍याही खेळाडूंना मिळत नाही. भारताचा राष्‍ट्रीय खेळ हॉकी आहे. भारताने ऑलिंपिकमध्‍ये ८ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे; मात्र हॉकीमधून खेळाडूंना पुष्‍कळ पैसे मिळतात, असे नाही. सध्‍या कबड्डी खेळाच्‍या स्‍पर्धा ‘आयपीएल’प्रमाणे आयोजित करण्‍यात येत असल्‍याने या खेळाडूंना थोडा का होईना पैसा मिळू लागला आहे. खेळाद्वारे चरितार्थ चालू शकत नाही, तो चालवण्‍यासाठी पैसा हा लागतोच. अनेक सरकारी आणि खासगी आस्‍थापने खेळाडूंना नोकरी देतात. या सरकारी आस्‍थापनांचे वेगवेगळ्‍या क्रीडा प्रकारांत संघही असतात आणि ते स्‍पर्धांमध्‍ये भागही घेतात. खेळाडूंना सरकारी स्‍तरावर अशा प्रकारे साहाय्‍य करण्‍यात येत असते. त्‍यामुळे त्‍यांचा चरितार्थ चालतो. काही दशकांपूर्वीच्‍या खेळाडूंना खेळांद्वारे पैसा मिळत नसल्‍याने त्‍यांचे जीवन शेवटपर्यंत गरिबीत जात होते. आता याचे प्रमाण अल्‍प आहे. असे जरी असले, तरी प्रत्‍येक खेळाडूचे कर्तव्‍य हे त्‍याने त्‍याचा खेळ अधिकाधिक चांगला करून त्‍याच्‍या संघाला विजयी करणे, देशाचे प्रतिनिधित्‍व करतांना देशाला विजयी करण्‍याचा प्रयत्न करणे, हे आहे. यामध्‍ये जर पैशांच्‍या अहंकारामुळे हानी होत असेल, तर अशा खेळाडूंना उतरती कळा लागल्‍याविना राहू शकत नाही. कपिल देव यांना हेच म्‍हणायचे आहे. कपिल देव यांनी सध्‍याच्‍या खेळाडूंना ज्‍येष्‍ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे मार्गदर्शन घेण्‍याचेही सुचवले आहे. काही दिवसांपूर्वी स्‍वतः गावसकर यांनीही म्‍हटले होते, ‘पूर्वीचे खेळाडू त्‍यांच्‍या खेळातील उणिवा दूर करण्‍यासाठी येत होते; मात्र आताचे खेळाडू त्‍यांच्‍याकडे येत नाहीत.’

साधनेचे महत्त्व !

तत्त्वज्ञानी लोक म्‍हणत असतात, ‘जीवनही एक खेळ आहे. या खेळात यशस्‍वी व्‍हायचे असेल, तर तो सराईतपणे आणि कोणत्‍याही मोहात न अडकता खेळला पाहिजे.’ जीवनातील कोणतेही कर्म करतांना त्‍यामागे जर साधनेचे विचार, बळ, त्‍याग आणि समर्पण असेल, तर ते कर्म कधीही यशस्‍वीच होते. हे सर्व होण्‍यासाठी साधना करणे आवश्‍यक आहे. साधनेचा संस्‍कार झाला असेल आणि साधनारत असू, तर कर्म योग्‍य होते. कोणत्‍याही क्षेत्रात यश मिळवण्‍याचा प्रयत्न करतांना नैतिकता राखली जाते. अपयश आले, तरी ते स्‍वीकारून त्‍यातून शिकून पुढे जाता येते. आजच्‍या पिढीमध्‍ये याचीच कमतरता आहे. इयत्ता १० वी किंवा १२ वीमध्‍ये अनुत्तीर्ण झाल्‍यावर आत्‍महत्‍या केलेल्‍यांची संख्‍या या देशात अल्‍प नाही. ही स्‍थिती साधनेचा भाग नसल्‍याचेच दर्शक आहे. जीवनाचा उद्देशच कळला नसल्‍याने आपल्‍याला नेमके काय साध्‍य करायचे आहे ? आणि आपण नेमके आता काय करत आहोत ? हेच समजत नाही. ते साधनेतून लक्षात येऊन आपण जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.