रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा !
मनमाड (नाशिक) – देहली येथे जाणारी वास्को-द-गामा- हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार मनमाड स्थानकावर सकाळी १०.३५ वाजता येणे अपेक्षित होते; परंतु ती दीड घंटा आधीच म्हणजे सकाळी ९.०५ वाजताच स्थानकावर आली आणि ५ मिनिटांनी तिचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना न घेताच निघून गेली. (जर आधीच रेल्वे पोचली होती, तर रेल्वे प्रशासनाकडून ती प्रवाशांसाठी थांबवण्यात का आली नाही ? – संपादक) मनमाड स्थानकावरून ४५ प्रवासी या रेल्वेत चढणार होते; पण रेल्वे दीड घंटा आधीच येऊन गेल्याने त्या वेळी तेथे एकही प्रवासी उपस्थित नव्हता.
सकाळी १० नंतर जेव्हा प्रवासी स्थानकावर येऊ लागले, तेव्हा त्यांना वरील प्रकार समजला. (गोवा एक्सप्रेससाठी येणार्या प्रवाशांच्या दृष्टीने स्थानकावर १० वाजल्यानंतर उद्घोषणा केली असती, तर प्रवाशांना स्वतःहून येऊन विचारावे लागले नसते ! – संपादक) त्यामुळे ते संतप्त झाले. (प्रवाशांना झालेला मनस्ताप आता कोण भरून काढणार ? – संपादक) त्यांनी स्टेशन मास्तरांकडे जाऊन ‘प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या’, अशी मागणी केली. त्यानंतर सर्व प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आले. गीतांजली एक्सप्रेसचा मनमाडमध्ये थांबा नसूनही या प्रवाशांसाठी तिला तेथे थांबवण्यात आले. त्यानंतर काही प्रवासी पुढे जळगावला उतरले. तेथे त्यांच्यासाठी गोवा एक्सप्रेसला थांबवण्यात आले होते. गोवा एक्सप्रेसचा नियोजित मार्ग बेळगाव-मिरज-दौंडमार्गे मनमाड असा असूनही ती रोहा-कल्याण-नाशिक रोडमार्गे मनमाडला आली. त्यामुळेच ती दीड घंटा आधीच पोचली. ‘रेल्वे कर्मचार्यांकडून ही चूक झाली आहे. यासंदर्भात चौकशी चालू आहे’, असे समजते