विधान परिषदेत भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी कागद फाडले !

उपसभापती नीलम गोर्‍हे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक !

सभागृहात गोपीचंद पडळकर आणि उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यात खडाजंगी !

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – २७ जुलै या दिवशी विधान परिषदेत अधिक वेळ बोलण्याच्या कारणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्यात मोठी शाब्दिक खडाजंगी झाली. सभागृहात गोपीचंद पडळकर यांनी कागद फाडले. त्यावर उपसभापतींनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. बराच वेळ पडळकर आणि उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यात शाब्दिक चकमक चालू होती; परंतु या वेळी सत्ताधारी आमदार आणि मंत्री मात्र शांत होते. अखेर विरोधी पक्षातील आमदार अंबादास दानवे आणि सदस्य सचिन अहिर यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

(सौजन्य : LOKMAT)

विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी सदस्यांना साधारणतः ८ ते १० मिनिटे दिली जातात; परंतु गोपीचंद पडळकर १३ मिनिटे बोलत होते. उपसभापतींनी ३ वेळा सूचना देऊनही पडळकर थांबत नव्हते, त्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे पडळकर यांना म्हणाल्या, ‘‘सभागृहाला वेठीस धरू नका.’’ त्यावर पडळकर म्हणाले, ‘‘तुम्ही नियोजन नीट करत नाही. उगाच वाद घालता.’’ या वेळी पडळकरांचा आवाज वाढला होता. येथूनच दोघांमध्ये खडाजंगी चालू झाली. अखेर गोर्‍हे यांनी पडळकर यांचा माईक बंद करण्यास सांगितले.