‘साधकांचे त्रास दूर व्हावेत आणि आम्हा साधकांना चैतन्य मिळावे’, यासाठी सद़्गुरुकाका प्रतिदिन ‘ऑनलाईन’ नामजपादी उपाय सत्संग घेतात. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि काही जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेल्या नामजपादी उपायांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१ अ. हनुमानाला आवाहन केल्यावर तो साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी सद़्गुरूंच्या आज्ञेने त्वरित उपस्थित झाल्याचे जाणवणे : ‘सद़्गुरु नंदकुमार जाधवकाका दृष्ट काढण्यासाठी हनुमानाला आवाहन करतात. तेव्हा ‘हनुमान त्यांच्या बोलावण्याची प्रतीक्षाच करत आहे आणि साधकांचे त्रास दूर करण्यासाठी तो सद़्गुरूंच्या आज्ञेने त्वरित उपस्थित झाला आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवते.
१ आ. नारळाने दृष्ट काढल्यावर त्रासदायक शक्ती नष्ट झाल्याचे दिसणे आणि सर्व ताजेतवाने होऊन आवरण निघून गेल्याचे जाणवणे : सद़्गुरु जाधवकाका सांगतात, ‘‘हनुमानाने नारळाने दृष्ट काढली असून त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे.’’ तेव्हा ‘जशी ‘व्हॅक्युम क्लीनर’मध्ये धूळ ओढली जाते, तशी आमच्या देहातून त्रासदायक शक्ती निघून नारळात खेचली जात आहे’, असे वाटते. त्यानंतर आम्ही सर्व एकदम ताजेतवाने अन् स्वच्छ झालो आहोत, म्हणजे आमच्यावरील आवरण संपूर्ण निघून गेले आहे आणि आमच्या देहातून त्रासदायक शक्ती निघून गेली आहे’, असे मला दिसले.
१ इ. ‘देवीकवच ऐकतांना श्री दुर्गादेवीच प्रत्यक्ष समोर उभी आहे’, असे मला वाटते. ‘जसे सद़्गुरु जाधवकाका बोलतात, अगदी तसेच सर्व प्रत्यक्ष घडत आहे’, असे मला जाणवते.
१ ई. ज्ञानेश्वरीतील ओवीतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवणारे सद़्गुरु नंदकुमार जाधव !
एकदा नामजपादी उपायांच्या वेळी सद़्गुरु जाधवकाका, यांनी पुढील ओवी म्हटली.
‘ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या । जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ – ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी १
अर्थ : ‘ॐ’ हे आदिशक्तीचे प्रथम स्वरूप असून ते वेदांनी प्रतिपादन केले आहे. तेच स्वसंवेद्य (स्वतःला जाणून घेण्यास समर्थ असणारे) अशा आत्मस्वरूपाने सर्वत्र कार्य करत आहे, अशा ‘ॐ’काररूपी (श्रीकृष्णरूपी) आदिशक्तीला नमस्कार असो.’
१ ई १. ‘सद़्गुरु जाधवकाका विष्णुस्वरूप गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) ओवीच्या माध्यमातून आर्ततेने आळवत असतांना श्री विष्णुरूपी गुरुदेवांनी साधकांवर कृपाकटाक्ष टाकून त्यांचा उद्धार केला’, असे दिसणे : सद़्गुरु काका ज्ञानेश्वरीतील वरील ओवी म्हणत होते. त्या वेळी मला दिसले,‘विशाल क्षीरसागरात श्रीविष्णुरूपी गुरुदेव शयन करत आहेत. श्रीभूदेवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि श्रीदेवी (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) त्यांची चरणसेवा करत आहेत. सद़्गुरु काका त्यांच्या समोर उभे राहून ओवीच्या माध्यमातून त्यांना आर्ततेने आळवत आहेत. त्यांची आर्त हाक ऐकून श्री विष्णुरूपी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकांवर त्यांचा कृपाकटाक्ष टाकला आणि ‘आम्हा साधकांचा उद्धार केला.’ त्या वेळी माझा भाव जागृत होत होता. ‘सद़्गुरु काकांची साधकांवरील प्रीती आणि त्यांचा उद्धार व्हावा’, अशी तळमळ पाहून अत्यंत कृतज्ञता वाटत होती. ‘माझे गुरुदेव’, ‘माझे गुरुदेव’ हाच माझा नामजप होत होता. सद़्गुरु काकांमुळे आम्ही भावविश्वाचे दर्शन करू शकतो. त्यासाठी गुरुस्वरूप सद़्गुरु काकांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
१ उ. जळगावमध्ये झालेल्या ‘हिंदु एकता दिंडी’मध्ये सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१ उ १. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्या चैतन्यामुळे ‘हिंदु एकता दिंडी’ला अद्वितीय प्रतिसाद मिळणे : १९.५.२०२२ या दिवशी जळगावमध्ये ‘हिंदु एकता दिंडी’ निघाली होती. तिला सद़्गुरु काकांच्या चैतन्यामुळे अद्वितीय प्रतिसाद मिळाला. जळगावचे लोक म्हणत होते की, ‘एवढी भव्य दिंडी आम्ही यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.’ सद़्गुरु काका ‘दिंडीची संपूर्ण सिद्धता करण्यासाठी प्रत्येक समितीची सिद्धता पहाणे, त्यांना प्रोत्साहन आणि प्रसाद देऊन चैतन्य देणे आणि बाल-कक्षातील बालसाधकांनी वाक्य कसे म्हणायचे आहे ? हात उंचावून कसे बोलायचे आहे ?’, हे सर्व स्वतः सांगत होते.
१ उ २. या ‘हिंदु एकता दिंडी’मुळे अनेक साधक क्रियाशील होणे आणि धर्मप्रेमी नियमित सेवेला येणे : त्यामुळे या दिंडीचा एवढा प्रभाव पडला की, कितीतरी साधक अनेक वर्षांपासून सेवेत क्रियाशील नव्हते, ते पुन्हा सक्रीय होऊन केंद्रातील दायित्व घेऊ लागले आहेत. एका साधकाची १५ वर्षांची मुलगी साधनेचे कोणतेच प्रयत्न करत नव्हती. ती दिंडीत सहभागी झाल्यानंतर आश्रमात येऊन सेवा आणि नामजप करू लागली. अनेक धर्मप्रेमी सेवेला नियमित येऊ लागले आहेत.
१ उ ३. एका धर्मप्रेमीच्या ८ वर्षांच्या मुलीला असलेला तीव्र आध्यात्मिक त्रास सद़्गुरु काकांना सांगितल्याक्षणीच न्यून होणे आणि त्या लहान मुलीने दिंडीमध्ये ‘देवासारखे दिसतात, तेच सद़्गुरु आजोबा ना ?’, असे तिच्या आईला विचारणे : एका धर्मप्रेमीच्या ८ वर्षांच्या मुलीला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. तो त्रास सद़्गुरु काकांना सांगितल्याक्षणीच न्यून झाला. ती मुलगीसुद्धा दिंडीत सहभागी झाली होती. तिच्या आईने तिला सांगितले, ‘‘तू सद़्गुरु आजोबांना कधी पाहिले नव्हतेस ना ? ते बघ तेथे उभे आहेत.’’ तेव्हा त्या मुलीने सदगुरु काकांकडे पाहिले आणि ती आपल्या आईच्या जवळ जाऊन म्हणाली, ‘‘आई, देवासारखे दिसतात, तेच सद़्गुरु आजोबा ना ?’’ हे वाक्य ऐकून तिच्या आईची पुष्कळ भावजागृती झाली आणि तिला अत्यंत कृतज्ञता वाटली.
१ ऊ. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांना सांगितल्यावर शारीरिक त्रास दूर होणे : दोन प्रसंगांमध्ये केवळ सद़्गुरुकाकांना सांगितल्यावर माझा त्रास दूर झाला.
१ ऊ १. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांना सांगितल्यावर गुडघ्यात होणार्या वेदना नाहीशा होणे : दोन मासांपूर्वी माझ्या उजव्या गुडघ्यात अकस्मात् तीव्र वेदना होऊ लागल्या. मला चालणेही कठीण झाले होते. वेदना होत राहिल्यामुळे आधुनिक वैद्यांची भेटीची वेळ (अपॉइंटमेंट) घेतली. जेव्हा सद़्गुरुकाकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘काय झाले ?’’ मी त्यांना त्रास सांगितला. त्यानंतर दोन दिवसांनी वेदना अशा नाहीशा झाल्या, जणूकाही मला कोणतेच दुखणे नव्हते आणि आजतागायत ते दुखणे पुन्हा आले नाही.
१ ऊ २. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांना सांगितल्यावर एका दिवसातच पोटदुखी नाहीशी होणे : दिंडीच्या आधी माझ्या पोटात अकस्मात् तीव्र वेदना चालू झाल्या. काहीही खाल्ले, तरी पोट दुखत होते. एवढे दुखायचे की, काही मिनिटे माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. याविषयी सद़्गुरु काकांना सांगितल्यावर एका दिवसातच पोटदुखी नाहीशी झाली.
१ ए. सद़्गुरु नंदकुमार जाधव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात साधकांना जाणवलेले साम्य !
१ ए १. प्रथमच पहाणार्या बालसाधकांनी सद़्गुरु काकांना ‘ते गुरुदेवच आहेत’, असे सांगणे : असे अनुभव अनेक केंद्रांमध्ये येत आहेत. जेव्हा सद़्गुरु काका एखाद्या केंद्रात जातात, तेव्हा त्यांना प्रथमच पहाणारे बालसाधक सांगतात की, ‘ते गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) आहेत.’
१ ए २. एका सत्संगात एका साधिकेचा भाव अकस्मात् जागृत होऊ लागला; कारण तिला सद़्गुरु काकांच्या ठिकाणी साक्षात् श्री गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) दिसत होते.
२. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक साधक, जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ सर्व जण सद़्गुरु जाधवकाका यांच्यातील प्रीतीमुळे सनातन संस्थेच्या कार्याशी कायमस्वरूपी जोडले जाणे
‘जर प्रीती सगुण रूपात आली, तर ती सद़्गुरु जाधवकाका यांच्या रूपात येईल’, असे मला वाटते. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक साधक, जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या प्रीतीने न्हाऊन निघत आहेत आणि सनातन संस्थेच्या कार्याशी कायमस्वरूपी जोडले जात आहेत.
३. सद़्गुरु काकांच्या खोलीतून सदैव दैवी सुगंध येतो.
४. सद़्गुरु जाधवकाका वयस्कर असूनही ते आम्हा सर्व तरुण साधकांपेक्षाही अधिक सेवा करतात. त्यांची ऊर्जा पाहून आम्हाला वाटते की, ‘आम्ही कितीतरी अधिक सेवा करायला पाहिजे.’
५. आश्रमातील श्वानाचा सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्याप्रती असलेला भाव
सद़्गुरु काका आश्रमातील श्वान ‘हिरा’ याच्याजवळ येतात, तर तोसुद्धा सद़्गुरु काकांच्या चरणांकडेच पहात रहातो. कधीही स्वतःचे डोके वर करून त्यांच्याकडे पहात नाही.
श्री गुरुमाऊलीने त्यांचेच रूप असलेल्या सद़्गुरु जाधवकाकांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना संजीवनीच दिली आहे. सद़्गुरु काका आहेत; म्हणून आम्हाला सर्व सेवा आणि साधनेचे प्रयत्न करणे शक्य होत आहे. हे श्रीगुरु, आपल्या रूपातील सद़्गुरु काकांच्या सेवेत आम्ही न्यून पडतो. त्यांचा आध्यात्मिक लाभ करून घेण्यात अल्प पडतो. यासाठी आम्हाला क्षमा करावी प्रभु ! दया करून आमच्यावर कृपा करावी की, चैतन्य आणि प्रीती स्वरूप सद़्गुरु काकांचा आम्ही लाभ करून घेऊ शकू. त्यांच्या चरणी आम्हाला समर्पित होता येऊ दे.’
– आपल्या श्री चरणी समर्पित होण्यास आतुरलेली,
सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव (४.६.२०२२)
|