राजापूर आणि लांजा तालुक्यांतील ६ दरडप्रवण गावांतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्नशील ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

(दरडप्रवण म्हणजे दरड कोसळण्याची शक्यता असणारे क्षेत्र)

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील ३ आणि लांजा तालुक्यातील ३ अशा दरडप्रवण ६ गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच राजापूरमधील गाळ उपशामुळे काही प्रमाणात पुराचा धोका न्यून झाल्याचे निदर्शनास आले असल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांचा १०० टक्के गाळ मुक्त करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी प्रांताधिकारी कार्यालयात राजापूर आणि लांजा तालुक्यांतील नैसर्गिक आपत्तीविषयी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराची पहाणी केली. त्यांनी धोपेश्वर गावातील दरडप्रवण क्षेत्राचीही पहाणी केली.

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले की, राजापूर तालुक्यातील धोपेश्वर खंडेवाडी, वडदहसोळ, हळदीची फांदी आणि परूळे पाटील वाडीतील ५ घरे हा दरडप्रवण क्षेत्रात येणारा अत्यंत धोकादायक भाग आहे. तसेच लांजा तालुक्यातील खोरनिनको मुसळेवाडी, इंदवटी बाईतवाडी आणि वनगुळे या गावांचा समावेश आहे.

राजापुरातील धोपेश्वर गावातील दरडप्रवण खंडेवाडी, गुरववाडी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकार्‍यांनी पहाणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. अतीवृष्टी काळात ग्रामस्थांनी या ठिकाणी राहू नये, प्रशासनाने व्यवस्था केलेल्या जागेत तात्पुरते स्थलांतरित होण्याविषयी त्यांनी आवाहन केले.

राजापुरातील पूररेषेचेही नव्याने सर्वेक्षण करण्याविषयी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.