रत्नागिरी – खेड तालुक्यातील मौजे कोंडीवली फाटा येथे मानवी वस्तीत आलेल्या ३ फूट लांबीच्या मगरीला वन विभाग वन्यजीव बचाव पथकाने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. वन्यजीव बचाव पथक खेडचे परिमंडळ वन अधिकारी सुरेश उपरे; वनरक्षक, खवटी राणबा बंबर्गेकर; वनरक्षक, तळे परमेश्वर डोईफोडे; वनरक्षक, आंबवली प्रियंका कदम, आणि अन्य सदस्यांनी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही पूर्ण केली.
सध्या खेड येथील जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आलेला आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी मानवी वस्तीत घुसलेले आहे. या पाण्यामधून मगरी, साप आणि अन्य प्राणी मानवी वस्तीत येत आहेत. त्यामुळे कुणीही घाबरून न जाता तात्काळ वन विभागास कळवावे किंवा वन विभागाचा ‘टोल फ्री’ क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.