राज्‍यभर पावसाचा जोर कायम !

मुंबई मध्ये मुसळधार पाऊस

मुंबई – मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्‍ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्‍यात आली आहे. यवतमाळ, पालघर, चंद्रपूर यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्‍यात आला आहे. हिंगोली, परभणी येथेही मुसळधार पाऊस होणार आहे. पुणे, सातारा घाट परिसर येथेही पावसाची चेतावणी देण्‍यात आली आहे. कोयना धरण भरून वहात आहे.

मुंबई – येथे आतापर्यंत १५५७ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. रेल्‍वेगाड्या २७ जुलै या दिवशी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्‍यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. दादर रेल्‍वेस्‍थानकावर मोठी गर्दी झाली होती. मुंबईत आझाद मैदान, ओशिवरा, कांदिवली आदी विविध ठिकाणी पाणी साचल्‍याने वाहतूक अत्‍यंत धिम्‍या गतीने चालू होती. ‘सायंकाळी ५.५८ मिनिटांनी साडेतीन मीटर उंचीच्‍या मोठ्या लाटा उसळतील’, अशी चेतावणी मुंबई महापालिकेने दिली होती. मुंबईतील उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

काजळी नदीला पूर आल्‍याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्‍यात आली आणि ती वाहतूक पावसमार्गे वळवली.

ठाणे – येथील वंदना बस स्‍थानकाबाहेर पाणी साचले होते. रेल्‍वेस्‍थानकाकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक वळवण्‍यात आली. जिल्‍ह्यातील जांभे धरण भरून वहात आहे. कल्‍याण रेल्‍वेस्‍थानकात पाणी साचले होते. बाजारपेठा आणि दुकाने येथेही पाणी साचले होते. मासुंदा तलाव परिसरात पाणी साचले. काही ठिकाणी गुढघ्‍याएवढे पाणी साचले होते.

ठाणे मध्ये मुसळधार पाऊस

कल्‍याण आणि डोंबिवली शहरांतही सखल भागात पाणी साचले.

पालघर – येथील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. वसई, विरार, नालासोपारा येथील नाले तुडुंब भरले आणि रस्‍त्‍यावर पाणी आले.

रायगड – येथील पाताळगंगा नदीला पूर आला असून  नदी काठच्‍या गावांना चेतावणी देण्‍यात आली आहे. पेण येथे गणेशमूर्ती बनवण्‍याचे कारखाने मोठ्या प्रमाणात असून तेथील श्री गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

रायगड मध्ये मुसळधार पाऊस

यवतमाळ – येथील दुर्गा नदीला पूर आल्‍याने कात्री गावात ७० हून अधिक घरांमध्‍ये पाणी गेले. शहर, तसेच राळेगाव येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कळंब येथील चक्रवर्ती नदीला पूर आल्‍याने १०० हून अधिक जणांच्‍या घरात पाणी गेले. शहरात नाल्‍याचे पाणी रस्‍त्‍यावर आल्‍याने नाला आणि रस्‍ता एक झाले होते. त्‍या नाल्‍यात एक महिला वाहून गेली. स्‍थानिकांनी तिला वाचवण्‍याचा प्रयत्न केला; परंतु यश आले नाही.

अमरावती – येथे ९ घंट्यांहून अधिक पाऊस पडला. सागर धरणाचे दरवाजे उघडले. नांदेड येथेही एक व्‍यक्‍ती वाहून गेली. हिंगणे १७ जणांना एन्.डी.आर्.एफ्.ने वाचवले.

सिंधुदुर्ग – जिल्‍ह्यात ४५ गावे पूरग्रस्‍त झाली असून शेकडो लोकांचे स्‍थलांतर करण्‍यात आले आहे.

रत्नागिरी – काजळी नदीला पूर आला आहे. राजापूरच्‍या जवाहर चौकात ५ फुटांपर्यंत पाणी साचले होते. सखल भागांत पाणी शिरले. चांदेराई गावातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.

काजळी नदीला पूर आला