अनाथ मुलांना उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये सामावून घेऊ ! – आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला-मुलींना शासकीय नोकरीमध्ये १ टक्का आरक्षण दिलेले आहे. त्यांना नोकरीसाठी अनेक सवलतीही देण्यात आलेल्या आहेत, तसेच त्यांना सर्व उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिले. त्या भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नास उत्तर देतांना बोलत होत्या.

या वेळी मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ५ सहस्र ५७४ मुलांना अनाथ प्रमाणपत्र दिले आहे. त्यांतील ३ सहस्र ५१६ ही १८ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांतील २३ मुलांना संस्थात्मक, तर ७३ मुलांना अन्य ठिकाणी नोकरी दिली आहे. उर्वरित मुलांना जाहिरात काढून नोकरी देण्याचा प्रयत्न करू. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना ‘अनुरक्षण गृहा’मध्ये रहाता येते. २२ जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी वसतीगृह आहेत, त्याचा लाभ घेता येईल. यासमवेतच ७४ ‘वर्किंग वुमन’ (काम करणार्‍या महिला) वसतीगृह आहेत, त्याचाही लाभ घेता येईल.