‘ऑनलाईन गेमिंग’ या जुगाराला गोव्यात थारा देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

‘ऑनलाईन गेमिंग’ हा जुगार गोव्यात मोठ्या प्रमाणात फोफावल्याचा आमदारांचा आरोप

पणजी, २६ जुलै (वार्ता.) – ‘ऑनलाईन गेमिंग’ हा जुगार गोव्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फोफावल्याचा आरोप गोवा विधानसभेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या काही आमदारांनी केला. राज्यातील तरुण पिढी ‘ऑनलाईन गेमिंग’च्या आहारी जात आहे. तरुण पिढीचे भवितव्य अंधकारमय होत आहे. सरकारने तातडीने यावर उपाययोजना काढण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘ऑनलाईन गेमिंग’च्या विरोधात पोलीस धडक कारवाई करत आहेत. आवश्यकता भासल्यास त्याविरोधात कायदा करण्यात येईल आणि यासाठी तमिळनाडू येथील कायद्याचा अभ्यास केला जाणार आहे. गोव्यात ‘ऑनलाईन गेमिंग’ हा प्रकार खपवून घेणार नाही.’’

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. सावंत उत्तर देत होते.

युरी आलेमाव म्हणाले, ‘‘गोव्यातील तरुण विविध ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड करून ‘ऑनलाईन गेमिंग’च्या माध्यमातून लाखो रुपये गमावत आहेत. काही तरुणांनी आत्महत्याही केली आहे. तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.’’

चर्चेत सहभाग घेतांना काँग्रेसचे केपेचे आमदार अल्टॉन डिकोस्ता म्हणाले, ‘‘केपे येथे १२ ते १३ ठिकाणी ऑनलाईन गेमिंग चालत आहे आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.’’

उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘ऑनलाईन गेमिंग’विषयी ‘ विज्ञापनांचे होर्डिंग हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अजूनही असे होर्डिंग असतील, तर तेही हटवण्यात येणार आहेत. या होर्डिंगवरील संकेतस्थळांचे अन्वेषण केले जात आहे. ‘ऑनलाईन गेमिंग’वर पोलीस कारवाई करत नसल्यास त्यांची नावे मला द्यावी. त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.’’


हे ही वाचा –

‘ऑनलाईन गेम’चा जुगार !
संपादकीय
https://sanatanprabhat.org/marathi/704879.html