मुंबई – वन्य प्राण्यांसाठी चारा, पाणी आदी सोयी उपलब्ध करणे; वनप्राण्यांचा उपद्रव थांबवणे या दृष्टीने वनविभागाच्या अनेक योजना आहेत; परंतु वनक्षेत्रात अतीक्रमण केलेल्यांना त्या त्या भूमी देण्यासाठी आग्रह केला जातो. परिणामी लाखो हेक्टर वनभूमी दिल्या गेल्या. वनक्षेत्राचे सरसकट पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाटप केले गेले आणि त्यामुळे वनक्षेत्र अल्प होत गेले अन् तेव्हापासूनच वन्य प्राण्यांपासून निर्माण होणार्या समस्यांमध्ये वाढ झाली. एवढेच नसून आता हे प्राणी मनुष्यवस्तीत येऊ लागले आहेत. असे असले, तरी सरकार या समस्यांवर उपाययोजना करत आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ जुलै या दिवशी विधानसभेत वन्य प्राण्यांच्या समस्येवर उपस्थित लक्षवेधीवर बोलतांना दिले. या वेळी वनमंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले की, वन्य प्राण्यांपासून मृत्यू झाल्यास वर्ष २००३ मध्ये देण्यात येणारी हानीभरपाई २ लाख रुपये रुपयांवर टप्प्याटप्प्याने वाढवत वर्ष २०२२ मध्ये ती २० लाख करण्यात आली. गाय, म्हैस, बैल आदींचा वन्य प्राण्यांच्या आक्रमणात मृत्यू झाल्यास देण्यात येणारे १० सहस्र रुपयांचे साहाय्य आता ७० सहस्र रुपयांपर्यंत करण्यात आले आहे. शेळी, मेंढी, बकरी आदींचा मृत्यू झाल्यास १५ सहस्र रुपये देण्यात येतील.