कोल्हापूर – २४ जुलैपासून काही प्रमाणात उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ४० फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली; मात्र राधानगरीसह अन्य धरणे भरल्याने त्यातून कधीही विसर्ग चालू होण्याची शक्यता असल्याने पंचगंगा नदी पुराच्या उंबरठ्यावर आहे. वर्ष २०१९ आणि २०२१ चा विचार करून ५२ फूट पाण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकार्यांनी सर्वांना दक्षतेची चेतावणी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजलाही स्थलांतर करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
१. पुणे-बेंगळुरू महामार्गालगत पश्चिम बाजूस असलेल्या सेवा मार्गावर २५ जुलैला पुराचे पाणी आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्गावर पाणी येऊ शकते, अशी स्थिती आहे. वर्ष २०१९ मध्ये ८ दिवस, तर वर्ष २०२१ मध्ये ४ दिवस महामार्गावर पाणी होते.
२. कोवाड (तालुका-चंदगड) येथे बाजारपेठेत नदीचे पाणी आल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
३. सातारा जिल्ह्याला २५ आणि २६ जुलैला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
४. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगली महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीतील सूर्यवंशी वसाहतीत जाऊन नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या, तसेच पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले. सध्या कृष्णा नदीवरील आयुर्विन पुलाची पाणीपातळी १८ फूट इतकी आहे.
५. इचलकरंजी-हुपरी रस्ता वाहतुकीसाठी पाणी आल्याने बंद झाला असून इचलकरंजीत पंचगंगेने ६४ फूट ६ इंच (धोका पातळी – ६८ फूट) पाणीपातळी गाठली आहे.
६. पूरग्रस्त भागातील २८ गावांमधील शाळांना आजपासून प्रशासनाच्या वतीने सुटी घोषित करण्यात आली आहे !
पुणे जिल्ह्यात २ दिवसांपासून मुसळधार पाऊसपुणे जिल्ह्यात २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या-नाले वाहू लागले आहेत. मुळशी तालुक्यात पावसाने सध्या चांगली हजेरी लावल्याने मुळा नदीला पूर आला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या भागांत, तसेच आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात ४-५ दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. |