१९.६.२०२२ ते २८.६.२०२२ या कालावधीत झालेल्या शिबिरासाठी सौ. माधुरी प्रकाश दीक्षित (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६४ वर्षे) या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्यांना शिबिरात जाणवलेली सूत्रे, आलेली अनुभूती आणि प्रसार करतांना लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच सद़्गुरु आणि संत यांच्या माध्यमातून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन या प्रक्रिया करून घेणे
‘१९.६ ते २८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी आश्रमातील शिबिर चैतन्याच्या स्तरावर झाले. त्यामुळे माझी अंतर्मुखता वाढली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद़्गुरु (सद़्गुरु स्वाती खाड्ये, सद़्गुरु नंदकुमार जाधव, सद़्गुरु चारुदत्त पिंगळे, सद़्गुरु अनुराधा वाडेकर) आणि संत (पू. अशोक पात्रीकर, पू. (सौ.) संगीता जाधव, पू. रमानंद अण्णा) यांनी आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया करून घेतली. मी घरी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करते; परंतु ती प्रक्रिया माझ्याकडून मनापासून होत नाही. शिबिरात अन्य साधक चुका सांगत असतांना ‘ते स्वभावदोष माझ्यातही आहेत’, असे माझे चिंतन होत होते. ‘सद़्गुरु आणि संत माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रिया करून घेऊन मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांजवळ येण्यासाठी पात्र बनवत आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
२. अनुभूती
शिबिरामध्ये परात्पर गुरु डॉक्टर आणि देवता यांचे अस्तित्व मला अनुभवता येत होते.
३. प्रसार करतांना जाणवलेली सूत्रे
३ अ. ‘सनातन संस्थेच्या कार्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच सर्व होत आहे’, याची जाणीव होणे : सनातन संस्थेच्या कार्याला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रसार करतांना सगळीकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व मला जाणवते. समाजातून प्रतिसाद मिळाल्यावर ‘हे सर्व प.पू. गुरुमाऊलीमुळेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच) झाले’, याची मला जाणीव होते आणि कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती होते.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सातारा येथे काढलेल्या दिंडीचे पोलिसांनी कौतुक करणे : २५.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सातारा येथे दिंडी काढली होती. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी सांगितले, ‘‘सनातन संस्थेच्या वतीने काढलेली दिंडी चांगली आणि शिस्तबद्ध झाली. तुमच्या दिंडीला उपस्थितीही चांगली होती.’’
‘प.पू. डॉक्टर, साधना आणि व्यवहार यांमध्येही प्रत्येक प्रसंगात आपणच मला सांभाळत आहात, त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. माधुरी प्रकाश दीक्षित (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६४ वर्षे), सातारा (२९.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |