श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या समवेत सेवा करतांना त्‍यांच्‍यातील दैवी गुणांचे घडलेले दर्शन !

‘श्री गणेशचतुर्थीच्‍या कालावधीत १० आणि ११.९.२०२१ या दोन दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातून त्‍यांच्‍या मूळ घरी, सावईवेरे (गोवा) येथे घेऊन जाण्‍याची आणि परत त्‍यांना रामनाथी आश्रमात घेऊन येण्‍याची सेवा मला दिली होती. त्‍या वेळी त्‍यांच्‍या सहज कृतीतून मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. वात्‍सल्‍यभाव

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्‍यांच्‍या समवेत असलेल्‍या सौ. कविता शहाणे, सौ. मीनल खेर (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ६२ वर्षे) आणि सौ. सुजाता सावंत या सहसाधिकांना ‘‘तुमची झोप व्‍यवस्‍थित झाली आहे ना ? तुम्‍ही अल्‍पाहार केला आहे ना ?’’, असे बोलून वात्‍सल्‍यभावाने त्‍यांची विचारपूस करत होत्‍या.

२. सतर्कता

१०.९.२०२१ या दिवशी श्री गणेशचतुर्थी होती. पहिल्‍या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या सावईवेरे येथील घरी जात असतांना त्‍यांनी वाटेत मला विचारले, ‘‘पुरोहितांनी श्री गणेश पूजनाचे साहित्‍य दिले का ?’’ मी साहित्‍य नीट पाहिले नसल्‍याने मी ‘‘नाही’’ असे म्‍हणालो. मी ‘‘नाही’’ म्‍हटल्‍यावर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी गाडी थांबवून साहित्‍य गाडीत ठेवले असल्‍याची निश्‍चिती केली. यात माझी चूक माझ्‍या लक्षात आली. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सर्व साहित्‍य गाडीत ठेवले आहे का ?’, हे पहाणे माझे दायित्‍व होते. ते पहाण्‍यास मी न्‍यून पडलो आणि माझ्‍याकडून चूक झाली.

श्री. निरंजन चोडणकर

३. साधकांकडून परिपूर्ण सेवा झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर त्‍यांचे कौतुक करणे

११.९.२०२१ या दिवशी, म्‍हणजे श्री गणेशचतुर्थीच्‍या दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्‍हा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या घरी जायचे होते. तेव्‍हा आदल्‍या दिवशी झालेली चूक पुन्‍हा होऊ नये; म्‍हणून मी आश्रमातील ३ – ४ साधकांचे साहाय्‍य घेऊन साहित्‍याची सूची सिद्ध केली. त्‍यानुसार साहित्‍य गाडीत भरून त्‍याची पडताळणी केली. याविषयी सहसाधकांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितल्‍यावर त्‍यांनी परिपूर्ण सेवा केल्‍याबद्दल आमचे कौतुक केले. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची कृपा मिळवण्‍यासाठी परिपूर्ण नियोजन करणे, नियोजनानुसार केलेल्‍या सेवांचा आढावा देणे, तसेच हे सर्व प्रामाणिकपणे करणे’, यांमुळे त्‍यांची कृपा होते’, हे मला अनुभवता आले.

४. इतरांचा विचार करणे

११.९.२०२१ ला रात्री श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना त्‍यांच्‍या घरून आणायला गेल्‍यावर ‘गाडीत जेवढे सामान राहील आणि सहसाधिकांना अडचण येणार नाही, एवढेच साहित्‍य न्‍यायचे’, असे त्‍यांनी सगळा विचार करून ठरवले. यावरून ‘कुठल्‍याही साधकाला प्रवासात त्रास होता कामा नये’, याची त्‍यांनी पूर्ण दक्षता घेतली’, असे माझ्‍या लक्षात आले. प्रवासातच त्‍यांनी सहसाधिकांना ‘आश्रमात पोचल्‍यावर लगेच विश्रांती घ्‍या’, असे सांगितले आणि त्‍यांचे दुसर्‍या दिवशीच्‍या सेवांचे नियोजनही केले.

५. इतरांची काळजी घेणे

रात्री उशिरा गाडीने प्रवास करतांना सेवेसाठी त्‍यांच्‍या समवेत गेलेल्‍या साधिकाही गाडीत होत्‍या. त्‍यांची त्‍या दिवशीची सेवा पूर्ण झाली होती. तेव्‍हा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ त्‍या साधिकांचे दुसर्‍या दिवशीचे नियोजन सांगतांना त्‍या साधिकांना म्‍हणाल्‍या, ‘‘आज दिवसभर पुष्‍कळ सेवा झाली ना ! आता पूर्ण विश्रांती घ्‍या. (त्‍यांचे निवासस्‍थान नागेशी येथे होते.) सकाळी तुम्‍हाला उशीर होईल. त्‍यामुळे प्रसाद (अल्‍पाहार) तुम्‍ही तिकडेच घ्‍या. तुमचे सर्व आवरून झाल्‍यावर भ्रमणभाष करा. चारचाकी गाडी तुम्‍हाला आणण्‍यासाठी पाठवते.’’ तेव्‍हा ‘साधकांचा विचार करतांना तो किती परिपूर्ण करायला हवा ?’, हे मला शिकायला मिळाले.

६. साधिकांना आश्रम पहातांना लाभ होण्‍यासाठी तळमळीने सांगणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ गाडीत समवेत असलेल्‍या साधिकांना म्‍हणाल्‍या, ‘‘रामनाथी आश्रमात आल्‍यावर तुम्‍ही आश्रम पहा. आश्रम म्‍हणजे केवळ भिंती नाही. त्‍यामुळे आश्रमाचा लाभ करून घेतांना भाव हवा.’’ त्‍या ‘आश्रम पहातांना लाभ कसा करून घ्‍यायचा ?’, हेही त्‍यांना सांगत होत्‍या. यावरून ‘साधकांना आध्‍यात्मिक लाभ व्‍हावा’, अशी त्‍यांची पुष्‍कळ तळमळ दिसून आली.

७. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वापरलेल्‍या गाडीविषयी कृतज्ञताभाव असणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ ज्‍या चारचाकी गाडीतून जात होत्‍या, त्‍या गाडीविषयी म्‍हणाल्‍या, ‘‘ही गाडी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आहे. त्‍या ही गाडी दैवी प्रवासासाठी घेऊन जात होत्‍या. गाडीत लावलेला ‘ॐ’ योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी रक्षणासाठी दिला आहे. गाडीत जी माळ आहे, ती ‘श्री भवानीदेवी’ची आहे.’’ त्‍या हे सर्व सांगत असतांना ‘त्‍यांना पुष्‍कळ कृतज्ञता वाटत होती’, असे माझ्‍या लक्षात आले.

‘प.पू. गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), आपण मला दोन दिवसांत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या समवेत सेवा देऊन त्‍यांच्‍याकडून शिकण्‍याची संधी दिलीत’, यासाठी आपल्‍या चरणी कृतज्ञ आहे. ‘त्‍यांच्‍याकडून शिकलेले कृतीत आणण्‍यासाठी तुम्‍हीच माझ्‍याकडून प्रयत्न करून घ्‍या’, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. निरंजन चोडणकर (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), गोवा. (२१.९.२०२१)