कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत !
कोल्हापूर, २४ जुलै (वार्ता.) – गेले काही दिवस सातत्याने होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी (३९ फूट) ओलांडली असून तिची वाटचाल आता धोका पातळीकडे (४४ फूट) होत आहे. जिल्हा प्रशासनाने भोगावती नदीवरील बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. कोल्हापूर शहरातील काही उपनगरे, तसेच चिखली येथील नागरिकांनी पुराचा संभाव्य धोका ओळखून स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पिकांनाही आता धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील एका राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापूर-गगनबावडा, चंदगड-बेळगाव, राधानगरी-निपाणी यांसह १४ मार्गांवरील वाहतूक बंद आहे. अनेक मार्ग बंद असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट क्षेत्रातही पाऊस सध्या वाढत असून कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ दिसून येत आहे. दुपारी कृष्णा नदीची पाणीपातळी आयर्विन पूल येथे १६ फूट एवढी नोंदवली गेली.