इरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्‍या २९

पनवेल रायगड जिल्‍ह्यातील इरशाळवाडी येथील दरड दुर्घटनेतील मृतांची संख्‍या आता २९ झाली आहे. २३ जुलै या दिवशी २ मृतदेह बाहेर काढण्‍यात आले. अद्याप ५२ ग्रामस्‍थांचा शोध लागलेला नाही. २४ जुलैपासून येथील शोधमोहीम आणि बचाव कार्य थांबवण्‍यात येणार आहे. अशी माहिती राज्‍याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. येथील ग्रामस्‍थांच्‍या पुनर्वसनाची सोय लवकरात लवकर केली जाईल, असेही त्‍यांनी सांगितले आहे.

येथील ४८ पैकी १७ घरे गाडली गेली आहेत. पावसामुळे दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असल्‍याने इतरांना इरशाळवाडीत येण्‍यास बंदी करण्‍यात आली असून येथे कलम १४४ लागू करण्‍यात आले आहे. दरड दुर्घटनेतून वाचलेल्‍या ग्रामस्‍थांना धीर देऊन त्‍यांना मानसोपचारतज्ञांच्‍या साहाय्‍याने दिलासा दिला जात आहे.