पुण्यात पडकलेल्या २ धर्मांध आतंकवाद्यांचा बाँबस्फोट करण्याचा डाव उधळला !

‘एन्.आय.ए.’च्या अन्वेषणात माहिती उघड !

पुणे – कोथरूड भागात पकडण्यात आलेल्या महंमद युनूस महंमद याकू साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान या २ आतंकवाद्यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.) चौकशी चालू करण्यात आली आहे. त्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एन्.आय.ए.’च्या अन्वेषणात आढळून आले आहे. या आतंकवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता ? याची माहिती घेण्यात येत असून त्यांच्यासह असलेल्या पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आतंकवाद्यांचा म्होरक्या (प्रमुख) महंमद शहनवाज आलम पसार झाला आहे.

यापूर्वी १० जुलै २०१४ या दिवशी शहराच्या मध्यभागातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडवण्यात आल्याची घटना घडली होती. याविषयी एन्.आय.ए., ए.टी.एस्., तसेच पुणे पोलीस यांकडून आतंकवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.

भाडेकरूंची नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचे उघड !

खान आणि साकी कोंढव्यात ज्या भागात रहायला होते, त्या भागाचीही पहाणी एन्.आय.ए.च्या पथकाने केली. इम्रान खान आणि युनूस साकी कोंढवा भागात भाडेतत्त्वावर रहात होते. दोघे ‘ग्राफिक्स डिझायनर’ म्हणून वावरत होते. दोघांची माहिती घरमालकाला नव्हती. घरमालकाने त्यांच्याशी भाडेकरार केला नव्हता. कोंढवा पोलीस ठाण्यात भाडेकरूंची नोंद घरमालकाने केली नसल्याचे अन्वेषणात उघडकीस आले आहे. शहरातील अनेक घरमालक भाडेकरूंची माहिती पोलिसांना देत नाहीत. भाडेकरूंची नोंद न केल्यास पोलिसांनी घरमालकांविरुद्ध कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. प्रारंभी घरमालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई बारगळल्याने पोलिसांना आता भाडेकरू नोंदणी मोहीम राबवावी लागणार आहे.