इरशाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू !

प्रशासनाकडून बचावकार्य चालू आहे

खालापूर – इरशाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ८६ जण बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य चालू आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली आणखी किती जण आहेत, याचा आकडा सांगणे कठीण असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. ‘नढाळ येथे मृतांच्या नातेवाइकांना ठेवले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार पुढील काम केले जाईल. हे बचावकार्य आणखी किती दिवस पार पाडायचे आहे, हे वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल’, असेही त्यांनी सांगितले.

इरशाळवाडी येथे परिसरात दुर्गंधी येत आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.

इरशाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले !

इरशाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हेे यांनी नढाळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्राला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांनी पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर केले. इरशाळवाडीमध्ये १ ते १८ वर्षे वयोगटापर्यंतची ३१ मुले आहेत. त्यापैकी २१ मुले आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. ही मुले १८ वर्षांची होईपर्यंत त्यांचे शिक्षण, पालनपोषण आणि आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहेत.

याआधीही मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्ष २०२० मध्ये महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत बचावलेली दोन लहान बालके आणि वर्ष २०२१ मध्ये पालघर येथील रोजगाराअभावी आत्महत्या केलेल्या कामगार दांपत्यांच्या २ मुलांचे पालकत्व स्वीकारले होते.