मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट !

श्री नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ देताना श्री एकनाथ शिंदे आणि सोबत त्यांचे कुटुंबीय

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ जुलै या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांचे वडील, पत्नी, मुलगा, स्नुषा आणि नातू उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले; मात्र कोणती राजकीय चर्चा झाल्याविषयीचे भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही.

या भेटीत इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या ठिकाणच्या साहाय्य कार्याविषयी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या दुःखद घटनेविषयी पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त करत सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पाविषयी माहिती देऊन हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, तसेच रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावेत’, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. कोकणातील पावसाचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्याविषयीच्या ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाची माहितीही एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक सुविधा यांविषयी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.