सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील अपार श्रद्धेच्‍या बळावर कर्करोगासारख्‍या दुर्धर रोगाशी झुंज देणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

‘उंचगाव (कोल्‍हापूर) येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या वर्ष १९९८ पासून सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून साधना करत आहेत. त्‍यांना कर्करोग झाला आहे; मात्र साधना केल्‍याने वाढलेल्‍या आत्‍मबळामुळे त्‍या अत्‍यंत धीरोदात्तपणे कर्करोगाचा सामना करत आहेत. २३.६.२०२३ या दिवशी माझी त्‍यांच्‍याशी भेट झाली. तेव्‍हा आणि या पूर्वी त्‍यांच्‍या संपर्कात आल्‍यानंतर त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सुजाताताई त्‍यांची आई श्रीमती उषा जाधव यांच्‍यासह उंचगाव येथे रहात. त्‍यांची लहान बहीण सौ. सुषमा घाटगे त्‍यांच्‍याच शेजारी रहाते. सुजाताताई धाराशिव येथील शासकीय रुग्‍णालयात सेवा करत होत्‍या. कोरोना महामारीच्‍या काळात रात्रंदिवस एक करून त्‍यांनी अत्‍यंत कौशल्‍याने तेथील रुग्‍णालयाचे दायित्‍व सांभाळले. त्‍यांची जाणवलेली काही गुणवैशिष्‍ट्ये गुरुचरणी अर्पण करत आहे.

वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव

१. साधना करत असतांना सुश्री सुजाताताई यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

१ अ. नीटनेटकेपणा आणि अचूकता : सुजाताताईंनी आजवर जिल्‍हा स्‍तरावरील विज्ञापन संकलन, अर्पण गोळा करणे इत्‍यादी सेवांची दायित्‍वे अत्‍यंत सहजतेने सांभाळली आहेत. ‘सर्व सेवा तपशीलवार, नीटनेटक्‍या आणि अचूक करणे’, हे त्‍यांचे वैशिष्‍ट्य आहे.

१ आ. कौटुंबिक दायित्‍वे पार पाडणे : धाकट्या बहिणीच्‍या (सौ. सुषमा घाटगे यांच्‍या) विवाहाचे दायित्‍व, तिच्‍या प्रसुतीच्‍या वेळचे दायित्‍व आणि तिला मुलगा झाल्‍यानंतर त्‍याचेही संपूर्ण दायित्‍व ताईंनी सहजतेने सांभाळले आहे. ताईंनी सौ. सुषमा यांचा मुलगा चि. अनय याच्‍यावर सुसंस्‍कार केले आहेत.

१ इ. साधक, रुग्‍ण आणि रुग्‍णालयातील वरिष्‍ठ आधुनिक वैद्य यांचा आधारस्‍तंभ असलेल्‍या सुजाताताई ! : ताई सहजतेने अन्‍यांना आपलेसे करून घेतात.

१.  १७.१०.२०२१ या दिवशी माझ्‍या बाबांचा अपघात झाला. तेव्‍हा ताई त्‍यांची सर्व कामे थांबवून दिवसभर आमच्‍या समवेत होत्‍या. त्‍यांना कर्करोगामुळे अस्‍वस्‍थ वाटत होते; मात्र ते दुखणे बाजूला ठेवून त्‍यांनी आमच्‍यासाठी वेळ दिला. त्‍यांच्‍या ओळखीनेच आम्‍ही बाबांना एका चांगल्‍या रुग्‍णालयात नेले. बाबा तेथून घरी परत आल्‍यानंतर आताही ताई बाबांच्‍या प्रकृतीविषयी विचारपूस करतात. अशा प्रकारचे साहाय्‍य त्‍यांनी अन्‍य अनेक साधकांना केले आहे. ताई साधकांसाठी विनामूल्‍य औषधे देतात. संपूर्ण जिल्‍ह्यातील साधकांना त्‍यांचा आधार वाटतो.

२. ताई धाराशिव येथील एका रुग्‍णालयात मोठे दायित्‍व सांभाळतात. आजूबाजूच्‍या परिसरातील खेडेगावातील काही रुग्‍ण असे आहेत की, ते आधी दूरभाष करून ‘ताई आहेत का ?’, असे विचारतात. ‘त्‍या असतील, तरच उपचारांना यायचे; अन्‍यथा नाही’, असे काहींचे म्‍हणणे असते. आजही ताई कराड येथे त्‍यांच्‍या आजोळी असल्‍या, तरी त्‍यांना धाराशिव येथील रुग्‍णांचे भ्रमणभाष येत असतात.

३. ताईंचा त्‍यांच्‍या वरिष्‍ठ आधुनिक वैद्यांना आधार वाटतो. ताईंनी एका वेळी अनेक सेवा कौशल्‍याने हाताळून त्‍यांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्‍यामुळे वरिष्‍ठ आधुनिक वैद्य ताईंना कोणत्‍याही प्रकारचे महत्त्वाचे दायित्‍व द्यायला आनंदाने सिद्ध असतात.

१ ई. भाव : ताईंचा ईश्‍वराप्रती पुष्‍कळ भाव आहे. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर त्‍यांची नितांत श्रद्धा आहे. त्‍यांच्‍या केवळ आठवणीनेही ताईंचा भाव जागृत होतो.

श्री. सागर निंबाळकर

२. सुश्री सुजाताताई कर्करोगाशी झुंज देत असतांना प्रकर्षाने जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये !

२ अ. कर्करोगाचे निदान झाल्‍यावरही रुग्‍णसेवा करायचे ठरवणे : सुजाताताईंना साधारणपणे २ वर्षांपूर्वी कर्करोग झाल्‍याचे समजले. त्‍यानंतर वैद्यांनी त्‍यांना ‘नोकरी सोडून विश्रांती घ्‍या !’, असे सांगितले होते; मात्र ताईंनी कर्तव्‍याला प्राधान्‍य दिले. त्‍यांनी ‘स्‍वतःवर औषधोपचार करत जितकी सेवा करता येईल, तितकी करूया’, असे ठरवले.

२ आ. देवावरील अपार श्रद्धा : गेल्‍या काही मासांपासून ताईंची प्रकृती खालावत आहे. त्‍यांची जखम बरी होत नाही. मे मधील एका किमोथेरपीनंतर त्‍यांना आलेला ताप न्‍यून होत नव्‍हता. आधुनिक वैद्यांनी त्‍यांना रुग्‍णालयातच थांबण्‍यास सांगितले होते. ताई अतीदक्षता विभागात उपचार घेत असतांना त्‍यांना सांगितलेले नामजपादी उपाय तळमळीने करत होत्‍या. आधुनिक वैद्यांना त्‍यांच्‍या या चिकाटीचे कौतुक वाटत होते. ताप न्‍यून होत नसल्‍याने आधुनिक वैद्य हतबल झाले होते; मात्र ताईंची देवावर अपार श्रद्धा होती. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातून सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्‍यांना प्राणशक्‍तीवहन पद्धतीप्रमाणे नामजप शोधून दिला. तो केल्‍यानंतर त्‍यांचा ताप न्‍यून झाला. जेव्‍हा आम्‍ही ताईंना भेटलो, तेव्‍हा हा प्रसंग त्‍यांनी आम्‍हाला सांगितला. त्‍या वेळी कृतज्ञतेने त्‍यांचा कंठ दाटून आला होता.

२ इ. आत्‍मबळामुळे प्रकृतीत पुष्‍कळ सुधारणा होणे : साधनेमुळे ताईंचे आत्‍मबळ पुष्‍कळ वाढल्‍याचे त्‍यांचे चुलत भाऊ, काकू, वहिन्‍या इत्‍यादी सर्वांना जाणवले. मे मासानंतर रुग्‍णालयातून घरी गेल्‍यानंतर ताईंच्‍या आत्‍मबळामुळे त्‍यांच्‍या प्रकृतीत पुष्‍कळ सुधारणा झाली. त्‍या जिना चढू आणि उतरू लागल्‍या. काही वेळा त्‍या चारचाकी वाहनातून शेताकडे मोकळ्‍या हवेत फिरायलाही जात असत.

२ ई. वैद्यकीय उपचार आणि नामजपादी उपाय चिकाटीने करणे : त्‍यांनी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांसाठी ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ, उदबत्ती, कापूर इत्‍यादी कोल्‍हापूर येथून मागवून घेतले होते. त्‍यांनी कोल्‍हापूर येथील काही वैद्यांकडून औषधेही मागवली होती. प्रतिदिन स्‍थानिक परिचारिका त्‍यांच्‍या जखमेवर पट्टी (बँडेज) बांधत असत. ताई सर्व प्रकारची पथ्‍ये काटेकोरपणे पाळत होत्‍या. सर्व प्रकारचे उपाय त्‍या उत्‍साहाने आणि न थकता करत होत्‍या. ‘एखादी गोष्‍ट नको’ किंवा ‘एखादी गोष्‍ट हवीच’, असे त्‍यांचे मुळीच नसे.

२ उ. २३.६.२०२३ या दिवशीच्‍या भेटीत जाणवलेली सूत्रे : २३.६.२०२३ या दिवशी आम्‍ही सुजाताताईंना रायगाव (तालुका कराड, जिल्‍हा सातारा) येथे त्‍यांच्‍या घरी भेटलो.

१. त्‍यांच्‍याकडे पाहून आम्‍हाला जाणवले, ‘त्‍या जरी घरी असल्‍या आणि सेवेत नसल्‍या, तरी त्‍यांची आंतरिक साधना चालूच आहे. त्‍यांच्‍या मनातील सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयीचा भाव वाढत आहे. त्‍यांच्‍यामध्‍ये कोणत्‍याही गोष्‍टीविषयीची आसक्‍ती नाही.’

२. त्‍या स्‍वतः वैद्या असल्‍याने त्‍यांना या रोगाची सर्व लक्षणे, दुष्‍परिणाम इत्‍यादी माहिती असूनही त्‍याची त्‍यांना भीती नव्‍हती. या सगळ्‍या स्‍थितीकडे त्‍या स्‍थिरपणे पाहू शकत होत्‍या.

३. ‘कुटुंबीय जे करतील, ते आनंदाने स्‍वीकारणे, घरच्‍या धार्मिक उपक्रमांत आनंदाने सहभागी होणे, पाहुण्‍यांनी काही खाऊ आणल्‍यास तो आनंदाने घेणे’ इत्‍यादी त्‍या करत होत्‍या.

४. त्‍या आमच्‍याशी स्‍वभावदोष-निर्मूलनाविषयी बोलल्‍या. जवळच्‍या व्‍यक्‍तीशी जुळवून घेण्‍यासाठी ‘स्‍वभावदोष-निर्मूलनाचे प्रयत्न आणखी वाढवायला हवेत’, अशी त्‍यांची तळमळ होती.

३. सुजाताताईंवर असलेली गुरुकृपा !

सुजाताताईंच्‍या विजिगीषु वृत्तीला त्‍यांचे सर्व मोठे चुलत बंधू आणि कुटुंबीय यांची साथ मिळत आहे. सर्व कुटुंबीय सुजाताताईंना अगदी फुलाप्रमाणे जपत आहेत. तेव्‍हा आमच्‍या लक्षात आले, ‘सुजाताताईंना सख्‍ख्‍या भावांपेक्षा अधिक काळजी घेणारे चुलत भाऊ आणि कुटुंबीय मिळणे’, ही त्‍यांच्‍यावरील मोठी गुरुकृपाच आहे.

४. प्रार्थना

‘हे गुरुदेवा, सुजाताताईंनी त्‍यांच्‍या जीवनात साधनेसह लोकसेवेला ईश्‍वरसेवा मानले. त्‍यामुळेच त्‍या सर्वांच्‍या लाडक्‍या आणि आधारस्‍तंभ ठरल्‍या आहेत. ‘अशा आमच्‍या सुजाताताईंवर तुमची अखंड कृपा राहू दे आणि त्‍यांची जलद आध्‍यात्मिक उन्‍नती होऊ दे’, ही आपल्‍या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.७.२०२३)