इरशाळवाडीतील बाधितांना सिडकोच्‍या माध्‍यमातून कायमस्‍वरूपी घरे देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – इरशाळवाडीमधील बाधित कुटुंबियांची तात्‍पुरती कंटेनरमध्‍ये व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या सर्व कुटुंबांची कायमस्‍वरूपी निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. याविषयी सिडकोच्‍या अधिकार्‍यांना सूचना देण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍याकडून जागेची निवड करण्‍यात आली आहे. कायमस्‍वरूपी घरे मिळत नाहीत, तोपर्यंत शासनाकडून या सर्व कुटुंबियांची व्‍यवस्‍था केली जाईल, असे निवेदन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जुलै या दिवशी विधानसभेत केले.

या वेळी एकनाथ शिंदे म्‍हणाले, ‘‘आपल्‍याकडे यंत्रणा होती; मात्र परिस्‍थितीमुळे तिचा वापर करता आला नाही. रात्री बचावकार्य थांबवण्‍यात आले होते; मात्र सकाळपासून पुन्‍हा बचावकार्य चालू करण्‍यात आले आहे. राष्‍ट्रीय आपत्ती निवारण दलाच्‍या जवानांच्‍या साहाय्‍याने २०-२५ जणांना वाचवण्‍यात आले आहे. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्‍यू झाला आहे, तर ८ जण घायाळ झाले आहेत. घायाळ व्‍यक्‍तींवर उपचार चालू आहेत. आतापर्यंत १०९ जणांची ओळख पटली आहे. काही जण मासेमारीसाठी गेले होते, काही जण भातशेतीच्‍या कामासाठी गेले होते. त्‍यामुळे ते वाचले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साहाय्‍यासाठी २ चॉपर हेलिकॉप्‍टरची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती; मात्र खराब हवामानामुळे त्‍यांचा वापर करता आला नाही. नातेवाइकांचा आक्रोश चालू होता. अतिशय भयानक आणि दुर्दैवी घटना होती; परंतु सर्वांनी माणुसकी दाखवली.’’