चिमणीलाही जाणवलेले सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍यातील चैतन्‍य आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा चिमणीच्‍या प्रती वात्‍सल्‍यभाव !

‘देहलीत सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे रहात असलेल्‍या खोलीच्‍या बाहेरील सज्‍जात वातानुकूलित यंत्राच्‍या बाहेरील भागाच्‍या जवळ एकदा चिमणीने घरटे केले होते. त्‍या वेळी चिमणीकडून शिकायला मिळालेले सूत्र आणि सद़्‍गुरु पिंगळेकाकांचा चिमणीच्‍या प्रती वात्‍सल्‍यभाव पाहून जे शिकायला मिळाले, ते श्री गुरूंच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) पावन चरणी अर्पण करते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मानस बंधन स्‍थळ-काळ-परिस्‍थिती यांच्‍या पलीकडे अनुभवावे !

‘आपण श्रीमन्‍नारायण गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) मानस बंधनात असल्‍याने कोणत्‍याही परिस्‍थितीत त्‍यांना सोडून जाण्‍याचा विचार न करता गुरुदेवांचे हे मानस बंधन स्‍थळ-काळ-परिस्‍थिती यांच्‍या पलीकडे अनुभवावे !’

– सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. चिमणीने अन्‍य खोलीच्‍या सज्‍जात घरटे न बांधता सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे रहात असलेल्‍या खोलीच्‍या सज्‍जात जेथे वातानुकूलित यंत्राचा बाहेरचा भाग बसवला आहे, तेथे करणे

दुमजली इमारतीच्‍या वरच्‍या माळ्‍यावरील दोन खोल्‍यांमध्‍ये वातानुकूलित यंत्र बसवले आहे. त्‍यातील एका खोलीत सद़्‍गुरु पिंगळेकाका रहातात. सद़्‍गुरु पिंगळेकाकांच्‍या खोलीच्‍या सज्‍जात अनेक जण ये-जा करत असतात. दुसर्‍या खोलीत शांतता असते आणि तेथे कुणी फारसे ये-जा करत नाहीत. खरेतर पक्षी वर्दळ नसलेल्‍या ठिकाणी घरटे बांधतात; मात्र चिमणीने घरटे सद़्‍गुरु पिंगळेकाकांच्‍या खोलीच्‍या सज्‍जात जेथे वातानुकूलित यंत्राचा बाहेरचा भाग बसवला आहे, तेथे केले होते.

२. ‘चिमणी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या सान्‍निध्‍यात स्‍वतःला सुरक्षित अनुभवत आहे’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने लक्षात येणे

‘पक्षी वातानुकूलित यंत्रावर बसू नयेत’, यासाठी त्‍यावर हिरव्‍या रंगाची जाळी (३ – ४ सें.मी. आकाराची छिद्रे असलेली) बसवली आहे. त्‍या जाळीच्‍या आत एका लहानशा चिमणीने घरटे केले. ते पाहून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने माझ्‍या लक्षात आले, ‘हे जीव सद़्‍गुरु पिंगळेकाकांच्‍या सान्‍निध्‍यात स्‍वतःला सुरक्षित अनुभवत आहेत. ‘सद़्‍गुरु येथे रहातात’, ही स्‍पंदने ओळखूनच चिमणीने घरटे केले.’ ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, जसे ती सद़्‍गुरु पिंगळेकाकांच्‍या सान्‍निध्‍यात येऊन स्‍वतःला सुरक्षित असल्‍याचे अनुभवत आहे, तसाच माझा भक्‍तीभाव असू दे’, अशी आपल्‍या श्रीचरणी प्रार्थना करते.

३. जाळीत अडकलेल्‍या चिमणीच्‍या पिल्लांना साधक बाहेर काढत असतांना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे खोलीत येणे

कु. पूनम चौधरी

३ अ. सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे खोलीत आल्‍यावर ‘साक्षात् परात्‍पर गुरु डॉ. आठवले तेथे आले आहेत’, असे अनुभवणे : चिमणीचे एक पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन खाली पडले आणि दोन पिल्ले जाळीत अडकली होती. साधक त्‍या पिल्लांना जाळीतून सोडवण्‍यासाठी आले. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला स्‍मरण झाले की, ‘एकदा असेच परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या खोलीजवळ चिमणीने घरटे केले होते.’ मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे नाव घेतले, त्‍याच वेळी सद़्‍गुरु पिंगळेकाका खोलीत आले. तेव्‍हा सद़्‍गुरु काकांकडून पुष्‍कळ सुगंध आला. ‘साक्षात् परात्‍पर गुरु डॉक्‍टरच तेथे आले आहेत’, असे मला अनुभवता आले.

३ आ. सद़्‍गुरु पिंगळेकाकांनी भगवंताच्‍या नियोजनाविषयी सांगणे : त्‍या वेळी सद़्‍गुरु पिंगळेकाका हात जोडून बसले होते. ते साधकांना सांगत होते, ‘‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर या प्रसंगातून आपल्‍याला शिकवत आहेत. येथे मे मासात कडक ऊन असते. त्‍यामुळे ‘चिमणीची पिल्ले जगतील कि नाही’, असे वाटत होते. भगवंत त्‍यांचे प्रारब्‍ध नष्‍ट करून पुढे घेऊन जात असेल, असेही असू शकते. घरट्यातील चिमण्‍यांच्‍या भोवती वलय दिसत आहे.’’

३ इ. सद़्‍गुरु पिंगळेकाकांचा चिमण्‍यांच्‍या प्रती वात्‍सल्‍यभाव जागृत होणे : त्‍या वेळी सद़्‍गुरु पिंगळेकाकांचा चिमण्‍यांच्‍या प्रती वात्‍सल्‍यभाव जागृत झाला होता. त्‍यांच्‍या डोळ्‍यांतील मधला भाग पिवळा झाला होता आणि डोळ्‍यांच्‍या चारही बाजूला लाल रंग दिसत होता. सद़्‍गुरु  पिंगळेकाकांचे हात निळसर झाले होते. सद़्‍गुरु  पिंगळेकाकांचा चिमण्‍यांच्‍या प्रती भाव पाहून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. सृष्‍टीतील प्रत्‍येक जिवावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या सद़्‍गुरु पिंगळेकाकांच्‍या श्रीचरणी मी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

३ ई. सद़्‍गुरु पिंगळेकाकांकडून साधकांना मिळालेली अनमोल शिकवण ! : जो भगवंत या लहानशा चिमण्‍यांच्‍या पिल्लांची काळजी घेतो, तो भगवंत आमची काळजी घेणार नाही का ?

४. प्रार्थना

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, आपण आम्‍हा साधकांचा हात पकडून आम्‍हाला साधनेत घेऊन आलात. आपण आम्‍हाला सद़्‍गुरु आणि संत यांच्‍या वात्‍सल्‍यरूपी छत्रछायेत ठेवले आहे. ‘आम्‍हा साधकांचा आपल्‍या परम दिव्‍य श्री चरणांप्रती अखंड शरणागतभाव राहू दे. आमच्‍याकडून आपल्‍याला अपेक्षित साधना होऊ दे’, हीच आपल्‍या परम दिव्‍य श्री चरणी प्रार्थना आहे.’

– कु. पूनम चौधरी, देहली (२७.५.२०२३)